१ जूनपासून घर मोजणी अभियान
By Admin | Updated: May 31, 2015 00:19 IST2015-05-31T00:19:11+5:302015-05-31T00:19:11+5:30
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी १ जूनपासून शहरात घरमोजणी अभियान सुरु होत आहे. यात नवीन,

१ जूनपासून घर मोजणी अभियान
आदेश : तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ४०० विद्यार्थ्यांची नियुक्ती
अमरावती : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी १ जूनपासून शहरात घरमोजणी अभियान सुरु होत आहे. यात नवीन, जुन्या घरांची मोजणी करुन मालमत्ता कर आकारणी केली जाणार आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार हे अभियान राबविले जात आहे.
गेल्या २० वर्षांपासून मालमत्तांचे करमूल्य निर्धारण करण्यात आले नाही. शहरात घरांची संख्या वाढली असताना प्रशासनाकडे केवळ दीड लाख मालमत्ता असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मालमत्तांची आकडेवारी ही अडीच लाखांच्या घरात पोहोचल्याचा अंदाज आयुक्तांचा आहे. शहराची लोकसंख्या साडेआठ लाख असताना करातून येणारे उत्पन्न फारच कमी असल्याच्या निष्कर्षाप्रत आयुक्त गुडेवार पोहोचले आहेत. परंतु कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने तांत्रिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची घर मोजणीसाठी निवड केली आहे. संबंधित शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापकांशी चर्चा करुन मानधन देण्याच्या अटीवर या विद्यार्थ्यांची घर मोजणीसाठी निवड करणात आली आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी घर मोजणी अभियान यशस्वीपणे राबविता यावे, यासाठी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिक पार पडले आहे. हल्ली महापालिकेला मालमत्ताकरातून दरवर्षी ४० कोटी अपेक्षित आहेत. मात्र, या करातून २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त प्राप्ती होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. उत्पन्नात घसरण झाल्याने महापालिकेचा कारभार कसा चालवावा?, हा सवाल अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. परिणामी आयुक्तांनी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणाऱ्यावर भर देण्याचे ठरविले आहे. या श्रृखंलेत घर मोजणी अभियानाचा पहिला टप्पा सोमवारपासून प्रारंभ केला जात आहे.
एका लिपिकाकडे
तीन गु्रप
घर मोजणी अभियानात एका कर वसुली लिपिकाकडे तीन विद्यार्थ्यांचे गु्रप देण्याची तयारी आहे. या मोजणीमध्ये दोन मुलांचा एक ग्रुप राहिल. प्रत्यक्ष मोजणीनंतर हा डेटा करवसुली लिपिकाकडे सादर केला जाईल. करवाढीवर भर देण्यासाठीच हे अभियान सुरु होत असल्याचे सांगितले जात आहे. ४०० विद्यार्थ्यांची चमू शहारातील घरे मोजणार आहे. प्राचार्यांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
हे अभियान घर मोजणीसाठी आहे. अवैध बांधकाम पाडणे किंवा अतिरिक्त बांधकाम पाडणे त्यासाठी नाही. नवीन, जुने घर तपासताना कर आकारण्यात आला अथवा नाही, याची शोधमोहिम सुरु होत आहे. घरांवर कर आकारणी करणे सुकर होईल.
-महेश देशमुख, मूल्य निर्धारण,
कर निर्धारण अधिकारी