सुटीच्या दिवशी एसटीलाही सुट्टी
By Admin | Updated: August 19, 2014 23:19 IST2014-08-19T22:35:04+5:302014-08-19T23:19:04+5:30
विद्यार्थ्यांना त्रास : खामगाव आगाराचा अफलातून निर्णय
सुटीच्या दिवशी एसटीलाही सुट्टी
खामगाव : आठवड्याचा रविवार तसेच इतर येणार्या शासकीय सुट्टीच्या दिवशी खामगाव आगाराची शहापूर, पिंपळखुटा मुक्कामी बसगाडी सुद्धा सुटी घेत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. खामगाव आगाराच्या अटाळी मार्गे शहापूर पिंपळखुटा एस.टी. बसेस चालू आहेत. रस्ता नादुरूस्त असल्याने गेल्या महिनाभरापासून पिंपळखुटा बस बंद करून ती शहापूर करण्यात आली आहे. शहापूर मुक्कामी असणार्या बसेस सकाळी ६ वाजेच्या दरम्यान तर दुसरी बस ७ वाजेच्या दरम्यान खामगावला निघते. या गाडीमध्ये वहाळा, कंचनपूर, बोथाकाजी, बोरीअडगाव यासोबत अटाळीपासून अनेक विद्यार्थी तसेच ग्रामस्थही सकाळीच खामगावात पोहचतात. मात्र खामगाव आगाराने अफलातून निर्णय घेवून पिंपळखुटा, शहापूर ही बसगाडी दर रविवारी तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. ही मुक्कामी बसगाडी बंद असल्याने दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता निघणार्या मुलांना ७ वाजेच्या एसटीने जावे लागत असल्याने शाळेत पोहचण्यास उशीर होतो. विद्यार्थ्यांनी याबाबत आगार व्यवस्थापकाकडे अनेकवेळा बसगाडी सुरू ठेवण्याची मागणी केली असता खामगाव आगाराने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. तरी विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचविण्यासाठी पिंपळखुटा, शहापूर बसगाडी सुरूच ठेवण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
उत्पन्न लाखोचे : सुविधाबाबत हलगर्जीपणा
खामगाव आगाराला विद्यार्थी तसेच इतर पासेसमधून दरमहा लाखोंचे उत्पन्न मिळत असतानाही विद्यार्थ्यांना मात्र सुविधा देण्यात आगार व्यवस्थापक कमी पडत आहे. गेल्या गुरूवारी शहापूर मार्गे ३ वाजेपासून एकही बस लागली नाही. परिणामी या मार्गावरील ३0 ते ४0 विद्यार्थ्यांना रात्री ९ वाजता घरी पोहचावे लागले. विद्यार्थ्यांचे पालक गावातील बसथांब्यावर वाट पाहत ताटकळत उभे होते. यावरून स्थानक व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा दिसून येतो.