धामणगावात जैववैद्यकीय कचऱ्याची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:52+5:30
ग्रामीण रुग्णालयात घातक कचरा विल्हेवाट लावण्याची कोणतीही कार्यप्रणाली कार्यान्वित नाही. मंगळवारी सकाळी हा घातक कचरा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात जाळण्यात आला. या घातक कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते, ही बाब काही नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाच्या लक्षात आणून दिली.

धामणगावात जैववैद्यकीय कचऱ्याची होळी
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : येथील ग्रामीण रुग्णालयात घातक कचरा जाळला जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी हा कचरा जाळ ला जात आहे, त्या बाजूला ग्रामीण रुग्णालयाची खिडकी आहे. धामणगाव नगर परिषदेने प्रदूषण नियंत्रण विभागाला या गंभीर बाबीची माहिती दिली आहे.
ग्रामीण रुग्णालयात घातक कचरा विल्हेवाट लावण्याची कोणतीही कार्यप्रणाली कार्यान्वित नाही. मंगळवारी सकाळी हा घातक कचरा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात जाळण्यात आला. या घातक कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते, ही बाब काही नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मुख्याधिकारी सुमेध अलोने व निरीक्षण अधिकारी राजू पठाण यांनी पाहणी करून घातक कचरा जाळला जात असल्याची खात्री केली.
ग्रामीण रुग्णालयात घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही प्रकिया नसल्याने यापूर्वी नगर परिषदेने ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांना कळविले होते. मात्र, कोणतीही उपाययोजना केली नाही. उलट मंगळवारी पुन्हा हा घातक कचरा जाळला आहे. याप्रकरणी नगर परिषदेने जिल्हाधिकारी व प्रदूषण विभागाला पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.
घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था ग्रामीण रुग्णालयाकडे नाही. त्यामुळे हा कचरा जाळण्यात येतो व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे, असेही मुख्याधिकाऱ्यांकडून जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पालिका क्षेत्रात कचरा जाळला जात असेल, तर संबंधितांकडून दंड वसूल करण्यासोबतच फौजदारी तक्रार नोंदविण्याचा अधिकार पालिका प्रशासनाला आहे. अमरावती शहरामध्ये कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या तक्रारीवरुन संबंधित किंवा अज्ञाताविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तथापि, धामणगावात पालिका प्रशासनाला कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे का, असा सवाल उपस्थित के ला जात आहे.
प्लास्टिक बॉटल जाळणे वैध?
ग्रामीण रुग्णालयातील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट शासननिर्देशानुसार केली जाते. अन्य कचरा जाळला जातो. प्लास्टिकच्या बॉटल जाळण्यात काहीही गैर नसल्याचा दावा अधिकारी पदावर विराजमान असलेले वैद्यकीय अधीक्षक करतात. वास्तविक कुठलाही कचरा जाळणे गैरकायदेशीरच आहे. पालिका प्रशासनाला कारवाईचे अधिकार आहेत. कचरा जाळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दंड व फौजदारी कारवाईची तरतूद आहे. असे असताना वैद्यकीय अधीक्षक कचरा जाळण्याच्या कृतीचे समर्थन कसे करू शकतात, असा सवाल उपस्थित झाला आहे.
ग्रामीण रुग्णालयात शासनाच्या आदेशाप्रमाणे घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. मंगळवारी प्लास्टिक बाटल्या जाळल्या. त्याचा मानवी आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही.
- डॉ. महेश साबळे
वैद्यकीय अधीक्षक
ग्रामीण रुग्णालयात घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही प्रकिया नाही. हा घातक कचरा मंगळवारी जाळला. प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईसाठी पत्र दिले आहे.
- सुमेध अलोने
मुख्याधिकारी, धामणगाव रेल्वे