धारणीकरांनी अनुभवले कोरोना मृत्यूची गंभीरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:14 IST2021-03-01T04:14:59+5:302021-03-01T04:14:59+5:30
श्यामकांत पाण्डेय धारणी : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, तालुका व शहरातील रुग्णांची संख्या पाचव्या शतकाकडे पोहोचत आहेत. ...

धारणीकरांनी अनुभवले कोरोना मृत्यूची गंभीरता
श्यामकांत पाण्डेय
धारणी : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, तालुका व शहरातील रुग्णांची संख्या पाचव्या शतकाकडे पोहोचत आहेत. अशातच एका कोरोना रुग्णाचा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने धारणीकरांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
धारणी शहरात कोविड केअर सेंटर असले तरी रुग्णांच्या निदानासाठी कोणतीही सुविधा नसल्यामुळे पहिल्यांदा उपजिल्हा रुग्णालयात ७५ वर्षीय महिलेचे कोरोनामुळे निधन झाल्याचे निदान झाले आणि आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. संबंधित रुग्णाला उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावर शनिवारी पहाटे अडीच वाजता गंभीर अवस्थेत आणले गेले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना अवघ्या काही तासांत तिने जगाचा निरोप घेतला. या आकस्मिक मृत्यूचे कारण तपासण्यासाठी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ती पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले. तिसऱ्या माळ्याला तात्काळ सील करण्यात आले असून, संपूर्ण वाॅर्ड सॅनेटाईज करण्यात आला.
कोरोनाबाधिताचा मृतदेह वाहून नेण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्यामुळे आमदार राजकुमार पटेल यांच्याकडील रुग्णवाहिका बोलावण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून मृतदेह अॅम्ब्यूलन्समध्ये टाकला. मृताच्या मुलालादेखील किट उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी मृताचे अंत्यदर्शन करण्यासाठी अत्यंत सावधानता बाळगत नागरिकांनी दुरूनच अंत्यसंस्काराचा सोपस्कार पाळला.
कोट
धारणी तालुक्यात आतापर्यंत ४४६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. पहिल्यांदा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी करण्यात आली.
शशिकांत पवार, तालुका आरोग्य अधिकारी
-------