सहा महिन्यांपूर्वी झाले एचआयव्हीचे निदान !
By Admin | Updated: March 12, 2015 00:52 IST2015-03-12T00:52:01+5:302015-03-12T00:52:01+5:30
पत्नी आणि दोन मुलींचा क्रूर बळी घेणाऱ्या प्रवीण मनवर या आयआयटी अभियंत्याला एचआयव्हीची लागण झाल्याचे सहा महिन्यांपूर्वीच कळले होते. प्

सहा महिन्यांपूर्वी झाले एचआयव्हीचे निदान !
अमरावती : पत्नी आणि दोन मुलींचा क्रूर बळी घेणाऱ्या प्रवीण मनवर या आयआयटी अभियंत्याला एचआयव्हीची लागण झाल्याचे सहा महिन्यांपूर्वीच कळले होते. प्रवीणने छत्तरपूर येथे केलेल्या पॅथॉलॉजी तपासणीत ही बाब उघड झाली होती.
शिल्पा यांचे थोरले बंधू अजय उर्फ बिरजू यांच्याशी ‘लोकमत’ने बुधवारी संपर्क केला. भीषण मानसिक धक्क्यातून जेमतेम सावरू लागलेल्या बिरजू ढाणके यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना ही बाब सांगितली. बिरजू यांनी दिलेल्या माहितीतून अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांचा उलगडा झाला.
प्रवीण याचे विवाहबाह्य संबंध होते. त्यातून त्याला एचआयव्हीची लागण झाली. सहा महिन्यांपूर्वीच प्रवीणला हे कळले. त्याने ती बाब पत्नी शिल्पाला सांगितली. त्यावेळपासूनच त्यांच्या घरी तणाव निर्माण होणे सुरू झाले असावे. तथापि, या बाबीबात शिल्पाने माहेरी कधीही वाच्यता केली नव्हती. दिवाळसणालाच ती येऊन गेली, पण याविषयी अवाक्षरही बोलली नाही. धाकटी पाऊने दोन वर्षांची परिणिती हिलाही एचआयव्हीची लागण झाली असावी, अशी शंका प्रवीणला होती. अस्वस्थ मनाच्या प्रवीणने सामूहिक आत्महत्येसाठी पत्नीला राजी केले असावे, असा अंदाज बिरजू यांनी व्यक्त केला. बिरजू हे घटनास्थळी जावून आलेत. मुलताई पोलीस आणि प्रवीणशी भेटून आले. त्यांना मिळालेल्या एकंदर माहितीवरून त्यांनी गोषवारा सांगितला. प्रवीण सांगत असलेले मुद्दे खरेच असावेत यावर मात्र बिरजू यांचा विश्वास नाही.
तपासणीशिवाय निर्णय कसा?
चिमुकल्या परिणितीला एचआयव्ही असावा, असा अंदाज प्रवीणने केवळ लक्षणांवरुन बांधला होता. तपासणीशिवाय कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहचू नये, इतके ज्ञान आयआयटीतून शिकलेल्या प्रवीणला नक्कीच होते. तरीही केवळ शंकेवरुन पोटच्या गोळ्याला असा क्रूर मृत्यू देण्याचा निर्णय घेण्यामागे नक्कीच षड्यंत्र असावे, असे शिल्पाच्या भावाला वाटते.
नातवाने दिली माहिती
शिल्पा आणि तिच्या दोन मुलींचा असा मृत्यू झाल्याची वर्दी बिरजू ढाणके यांच्या इयत्ता बारावीतील मुलाने आजोबांना दिली. ८१ वर्षांच्या सखारामचे त्यावेळी जणू सर्वस्वच संपले.
‘त्या’ तिघांचे बयाण
मुलताई पोलीस बुधवारी अमरावतीत येवून गेलेत. प्रवीणचे अमरावतीत वास्तव्यास असलेल्या तीन मित्रांचे पोलिसांनी बयाण नोंदविले. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यायातील प्राध्यापक राहुल वानखडे व त्यांचे बंधू तसेच टी.बी. रूग्णालयाचे कर्मचारी सचिन बोंडे अशी त्या तिघांची नावे आहेत. शंकरनगर परिसरात असलेल्या प्रवीणच्या मालकीच्या फ्लॅटला पोलिसांनी सील ठोकले.