एचआयव्हीबाधित ३८ रुग्ण मरणाच्या दारी
By Admin | Updated: May 18, 2016 23:59 IST2016-05-18T23:59:47+5:302016-05-18T23:59:47+5:30
टीएल औषधींचा तुटवड्यामुळे एचआयव्हीबाधित ३८ रुग्ण सद्यस्थितीत मरणाच्या दारी आहेत. शासनाकडूनच पुरवठा होत नसल्यामुळे हे रुग्ण हताश झाले आहेत.

एचआयव्हीबाधित ३८ रुग्ण मरणाच्या दारी
लोकमत विशेष
अमरावती : टीएल औषधींचा तुटवड्यामुळे एचआयव्हीबाधित ३८ रुग्ण सद्यस्थितीत मरणाच्या दारी आहेत. शासनाकडूनच पुरवठा होत नसल्यामुळे हे रुग्ण हताश झाले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात एचआयव्ही एडस्ग्रस्तांच्या उपचारासाठी अमरावती जिल्हा एडस् प्रतिबंधक, नियंत्रण कक्ष आहे. आतापर्यंत या कक्षाच्या माध्यमातून ४ हजार ४५० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी २ हजार ४२२ एड्सग्रस्तांवर औषधोपचार सुरु आहे. यापैकी ३८ रुग्णांना टीएल औषधींची आवश्यकता आहे. या औषधींचा पुरवठा महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्थेमार्फत राज्यभरात केला जातो. मात्र, इर्विन रुग्णालयाला टीएल औषधींचा पुरवठा होत नसल्यामुळे रुग्णांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. टीएल ही औषधी खासगी क्षेत्रात मिळते. महिनाभराची टीएल औषधी १ हजार ४०० रुपयांची होते. मात्र, गोरगरिब एडसग्रस्तांना हे औषधी विकत घेणे सहज शक्य होत नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या सांगण्यावरून तीच औषधी खासगीक्षेत्रातून ८०० रुपयांमध्ये देण्यात येत आहेत. मात्र, आता खासगीक्षेत्रातही टीएल औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. टीएल औषधींचा पुरवठा महिनाभरापासून बंद असल्यामुळे एडसग्रस्तांची वणवण भटकंती सुरु आहे. यासंदर्भात जिल्हा एडस् प्रतिबंधक, नियंत्रण कक्षाचे अधिकारी अजय साखरे यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांची भेट घेऊन टीएल औषधी उपलब्ध नसल्याचा मुद्दा मांडला. जिल्हा एचआयव्ही एड्स फोरम यांनी यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत यांना एक निवेदन सुध्दा सोपविले आहे. (प्रतिनिधी)
रूग्णांच्या निवासाची व्यवस्था करा
एचआयव्हीग्रस्त रुग्ण शहर व शहराबाहेरून इर्विनच्या एआरटी केंद्रात औषधोपचाराकरिता येतात. त्यांना मुक्काम करावा लागतो. परंतु सोय नसल्याने त्यांचे हाल होतात.त्यांच्यासाठी इर्विनच्या धर्मशाळेत निवासाची व्यवस्था करण्याची मागणी जिल्हा एचआयव्ही, एड्स फोरमने केली आहे
एडस्ग्रस्तांवर एआरटी केंद्रातून उपचार केले जातात. ३८ गरजू रुग्णांची नोंद आमच्याकडे आहे. औषधींच्या तुटवड्यासंबधी वरिष्ठस्तरावर कळविण्यात आले आहे. १५ दिवसांत पुरवठा होईल.
- अजय साखरे, कार्यक्रम अधिकारी, एआरटी केंद्र.
इर्विनची लिफ्ट सहा महिन्यांपासून बंद
इर्विन रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्षाच्या इमारतीमधील लिफ्ट सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे एडसग्रस्तांना पायऱ्या चढूनच जावे लागत आहे. एडसग्रस्तांची प्रतिकारक्षमता कमी असते. ते अशक्त असतात. अशा रुग्णांना पायऱ्या चढून तिसऱ्या माळ्यावरील कक्षापर्यंत जावे लागत आहे. यासंदर्भात एआरटी केंद्राचे प्रमुख अजय साखरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी ९ वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही लिफ्ट तातडीने दुरूस्त करण्याची मागणी आहे.