शाळा सुरू करण्याचा निर्णय टळत असल्याने हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:17 IST2021-08-20T04:17:42+5:302021-08-20T04:17:42+5:30
अमरावती : राज्य शासनाकडून आतापर्यंत तीन वेळा शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी लगेचच पुन्हा शाळा ...

शाळा सुरू करण्याचा निर्णय टळत असल्याने हिरमोड
अमरावती : राज्य शासनाकडून आतापर्यंत तीन वेळा शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी लगेचच पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द होत असल्याने विद्यार्थी शिक्षक व पालकांचा हिरमोड होत आहे. दोन वर्षांपासून ऑनलाईन अभ्यासक्रमाचा मुलांना आता कंटाळा आला आहे. शाळेत हसत खेळत व समजून घेत शिकण्यास विद्यार्थी उत्सुक असताना शाळेची घंटा वाजत नसल्याने पालकांची नाराजी दिसून येत आहे.
बॉक्स
नियमित वर्ग सुरू होणे गरजेचे आहे
ऑनलाईन प्रणालीने शाळा सुरू आहेत .मात्र ग्रामीण भागातील मुलांकडे स्मार्टफोन मोबाईल नाही. त्याशिवाय नेटवर्कची ही समस्या आहे. शासन आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्याना विविध माध्यमातून शैक्षणिक कार्य करण्याचे काम केले जात आहे. असे असले तरी मुलांच्या सर्वागीण विकासासाठी शाळा वर्ग सुरू होणे गरजेचे असल्याचे मत शिक्षकामधून व्यक्त होत आहे.
बॉक्स
नियम घालून शाळा सुरू व्हाव्यात
ऑनलाइन प्रणालीची गोडी आता संपत असल्याचे दिसून येत आहे. मुले मोबाईलचा वापर अभ्यास करण्यापेक्षा अन्य मनोरंजनासाठी करीत असल्याचे दिसून येत आहे. मुलांचा अष्टपैलू दृष्टिकोनातून विकास होण्यासाठी शाळा वर्ग होणे आवश्यक आहे.
बॉक्स
गुणवत्ता ढासळत आहे
गेल्या दोन वर्षापासून सरसकट सर्वच विद्यार्थ्याना उत्तीर्ण करण्यात येत आहे. यामुळे मुलांची शिक्षणातील रुची कमी होत आहे. मोबाईलवर केवळ अर्धा तास घातला तर पास होता येते असा समज आता मुलामध्ये होत आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक दर्जा ढासळत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर शैक्षणिक दर्जा खूपच खालावला जाणार आहे. यामुळे शाळा सुरू करणे महत्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत.