येथे मरणानंतरही संपेना यातनांचे भय!
By Admin | Updated: June 8, 2015 00:27 IST2015-06-08T00:27:52+5:302015-06-08T00:27:52+5:30
असे कविवर्य कै. सुरेश भट यांनी आपल्या कवितेत म्हटले असले तरी परतवाडा येथील स्मशानभूमी गैरसोयींच्या विळख्यात ..

येथे मरणानंतरही संपेना यातनांचे भय!
स्मशानभूमीवर अवकळा : अंधारातच उरकावे लागतात अंत्यसंस्कार
सुनील देशपांडे अचलपूर
जाताना इतके मजला सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
असे कविवर्य कै. सुरेश भट यांनी आपल्या कवितेत म्हटले असले तरी परतवाडा येथील स्मशानभूमी गैरसोयींच्या विळख्यात असल्याने मरणानंतरही माणसाची छळातून सुटका होत नाही. येथील स्मशानभूमीत अनेक समस्या असल्याने मृतदेहाची अवहेलना तर होतेच पण अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना अनेक गैरसोयींना तोंड देत अंत्यसंस्कार करावा लागतो. शुक्रवारी रात्री स्मशानभूमीतील विद्युत पुरवठा खंडित असल्याने एका पार्थिवावर अंधारात अंत्यंस्कार करावा लागल्याने अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांनी संताप व्यक्त केला.
गावात स्मशानभूमी असणे सामाजिक गरज आहे. त्या स्मशानभूमीत सोई सुविधा असणे अपेक्षित असते. तसेच आपण ज्या गावात जन्मलो तेथेच आपल्याला मरण येऊन येथेच आपला अंत्यसंस्कार व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण परतवाडा येथील स्मशनभूमीत विद्युत पुरवठा असूनही तो बरेचदा खंडित झालेला असतो. काही खांबांवरील लाईट गेलेले आहेत.
मुख्य रस्त्यानंतर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बेशरमच्या झाडांनी विळखा घातला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी एखाद्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यास रस्त्यावर बरेचदा विंचू, साप असे सरपटणारे प्राणी लोकांच्या दृष्टीस पडतात.
अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी व्यवस्थित सोय नाही. स्मशानभूमीजवळ पाण्यासाठी एक हापसी लावण्यात आलेली असून त्यावर मोटारीची सोय नाही. स्मशानभूमीत स्वच्छतेचा अभाव असतो. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामना तर करावाच लागतो. पण येथील गैरसोय बघून त्रासलेल्या जीवनातून मरणही नकोसे वाटते.
शुक्रवारी पंचायत समितीमध्ये लिपीक असलेले विवेक दिवाकर यांचे निधन झाले. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता त्यांना बिच्छन नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. स्मशानभूमीतील विद्युत पुरवठा खंडित झालेला असल्याने स्वर्गरथ या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिवाकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
अचलपूर-परतवाडा मार्गावरुन स्मशानभूमीकडे जाणाऱ्या साधारण एक किमी रस्त्यावरील पथदिवेही बंद होते. त्यामुळे अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये संताप व्यक्त होत होता.
रस्त्याच्या कडेला झाडेझुडूपी वाढली असून बेशरमच्या झाडांनी दाटी केली आहे. अनेकदा येथील विद्युत पुरवठा खंडित असतो. शुक्रवारी विवेक दिवाकर यांच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लाईट नसल्योन अंधार होता. स्वर्गरथाच्या लाईटाच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावा लागला. रस्त्यावरील पथदिवे बंद होते. या समस्यांची तक्रार मी पालिकेच्या तक्रार बुकात केली.
- संजय चोखे,
अध्यापक, सुबोध हायस्कूल.
स्मशानभूमीतील झालेल्या गैरसोईची संपूर्ण चौकशी करुन त्यात आमचे अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई करुन रस्त्याची झाडे झुडुपी तोडण्यात येतील. वीज पुरवठा का खंडित झाला याचीही माहिती घेणार आहे.
- धनंजय जावळीकर, मुख्याधिकारी, अचलपूर.