जिल्ह्यात हेल्मेटसक्तीचा मुहूर्त ठरेना !

By Admin | Updated: February 9, 2016 00:01 IST2016-02-09T00:01:58+5:302016-02-09T00:01:58+5:30

परिवहन मंत्र्यांच्या हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला पुणेकरांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविल्याने पुणे-औरंगाबाद वगळता राज्यात अंमलबजावणीला सर्वदूर मुहूर्त गवसलेला नाही.

Helmets in the district! | जिल्ह्यात हेल्मेटसक्तीचा मुहूर्त ठरेना !

जिल्ह्यात हेल्मेटसक्तीचा मुहूर्त ठरेना !

प्रदीप भाकरे अमरावती
परिवहन मंत्र्यांच्या हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला पुणेकरांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविल्याने पुणे-औरंगाबाद वगळता राज्यात अंमलबजावणीला सर्वदूर मुहूर्त गवसलेला नाही. हेल्मेटसक्तीचा निर्णय होण्यापूर्वी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन यंत्रणेने सावध पवित्रा घेतला आहे.
पुणे आणि औरंगाबादेत हेल्मेट अनिवार्य केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणारे पत्र परिवहन आयुक्तांनी जारी केले. तत्पूर्वी रावतेंच्या या निर्णयाविरूध्द त्यांचे स्वकीयच उभे ठाकल्याने हेल्मेट सक्तीबाबतची नाराजी तीव्र स्वरूपात पुढे येऊ लागली आहे. अचानक सक्ती केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही यंत्रणेला सतावते आहे. हेल्मेट उत्पादकांची घरे भरण्यासाठी ही सक्ती असल्याची टीका होत असल्याने हेल्मेटसक्ती अंमलबजावणीचा मुद्दा तुर्तास वादग्रस्त बनला आहे.

विरोधाचा सूरही : जनजागृतीवर भर, नागरिकांना द्यावा वेळ
शहरात हेल्मेट सक्ती केव्हा?

पुरेशा जनजागृतीनंतर आणि संबंधित विभागाशी समन्वय राखत हेल्मेटची अंमलबजावणी करण्याचा पवित्रा पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात सर्वदूर जनजागृती झाल्यानंतर १५ ते २० दिवसांनी ‘स्ट्रिक्टली इम्प्लीमेंटेशन’ केले जाईल, अशी प्रतिक्रिया एसपींची आहे.

दूरवरच्या प्रवासात हेल्मेट
तालुकास्तरावर ये-जा करणाऱ्यांसह दूरचा प्रवास करणारे दुचाकीस्वार हेल्मेट वापरतात. मात्र, शहरात हेल्मेटधारकांची संख्या त्यांच्या तुलनेत कमी आहे.

हेल्मेटची विक्री वाढली
अंमलबजावणी सुरू झाली की, पोलिसांकरवी कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यानंतर हेल्मेट अव्वाच्या सव्वा दराने विकले जातात. या पार्श्वभूमिवर मागील काही दिवसांपासून हेल्मेटची विक्री वाढल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले.

दुचाकीस्वारांसह मागे बसणाऱ्यांसाठी हेल्मेट अनिवार्य करण्याचा निर्णय संपूर्ण राज्यात लागू आहे. पुणे, औरंगाबादमधून सुरुवात झाली. अंमलबजावणीचे आदेशही काढले आहेत.
- दिवाकर रावते
परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य

हेल्मेटसक्तीसाठी पूर्वनियोजन आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन विभागाशी समन्वय साधून अंमलबजावणी केली जाईल. यासाठी अद्याप तारीख ठरलेली नाही.
-दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त, शहर आयुक्तालय

हेल्मेटसक्ती अनिवार्य आहे. मात्र, तत्पूर्वी हेल्मेट खरेदी करण्यासाठी नागरिकांना वेळ द्यावा लागेल. जनजागृती केल्यानंतर १५ ते २० दिवसांनी सक्त अंमलबजावणी करण्यात येईल.
-लखमी गौतम, पोलीस अधीक्षक, ग्रामीण

हेल्मेट अनिवार्य करण्याबाबतचे परिवहन आयुक्तांचे पत्र प्राप्त झाले. निरीक्षकांकरवी हेल्मेटबाबतची तपासणी करु. अंमलबजावणी करावीच लागेल. यापूर्वीच जनजागृती केली आहे.
- श्रीपाद वाडेकर, आरटीओ

Web Title: Helmets in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.