मेळघाटात भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:32 IST2018-04-27T01:32:24+5:302018-04-27T01:32:24+5:30
मेळघाटातील जीवनदायिनी गडगा व सिपना नदीचे पात्र आतापासूनच आटले आहे. आता अनेक ठिकाणी या नदीपात्रात खोदकाम करून मोठमोठे तळे तयार करण्यात येत आहे. या पात्रातून अवैधरीत्या पाण्याचा प्रचंड उपसा करून सिंचनासह वीटभट्टीकरिता वापरण्यात येत आहे.

मेळघाटात भीषण पाणीटंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटातील जीवनदायिनी गडगा व सिपना नदीचे पात्र आतापासूनच आटले आहे. आता अनेक ठिकाणी या नदीपात्रात खोदकाम करून मोठमोठे तळे तयार करण्यात येत आहे. या पात्रातून अवैधरीत्या पाण्याचा प्रचंड उपसा करून सिंचनासह वीटभट्टीकरिता वापरण्यात येत आहे. त्यामुळे या नद्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. मात्र,याकडे महसूल, पाणीपुरवठा आणि सिंचन विभागाने दुर्लक्ष केल्याने याचा फटका पाळीव प्राण्यांसह वन्यप्राण्यांनाही बसत आहे.
सध्या ज्या नदी-नाल्यांत पाण्याचे स्त्रोत आहे, अशा ठिकाणी तळे बनविले जात आहे. आपले स्वार्थ साधण्यासाठी खड्डे करून पाणी उपसा केला जात आहे. यामुळे नदी-नाल्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. धारणीसह गावखेड्यातील पाणीपुरवठा योजना त्यामुळे विस्कळीत झाली आहे. नादी-नाल्यातील पाणी आटल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले असून कृत्रिम पाणवठ्यांची अवस्थाही अतिशय गंभीर आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांना गावाकडे स्थलांतरित व्हावे लागत आहे. यावर त्वरित तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.
कोल्हापुरी बंधारे कोरडे
तालुक्यातील गडगा नदीवर धूळघाट रोड, कळमखार, रोहणीखेडा, गडगामालूर, तर सिपना नदीवर हरिसाल, कढाव, उतावली, दिया येथे कोल्हापुरी बंधारे आहेत. मात्र, योग्य नियोजनाअभावी हे कोरडे पडले असल्याने पाण्याची दुर्भिक्षता वाढण्याचे संकेत आहे.
यंदा अल्प पावसामुळे परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वन्यप्राण्यांसह सजीवसृष्टीला पाणी मिळावे, या दृष्टीने अवैधरीत्या केला जाणाऱ्या उपस्यावर निर्बंध लावण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहे. नियमभंग केल्यास कारवाई करू.
- संगमेश कोडे,
तहसीलदार, धारणी