आयुक्तांनी घेतली हरकतींवर सुनावणी
By Admin | Updated: November 18, 2016 00:21 IST2016-11-18T00:21:57+5:302016-11-18T00:21:57+5:30
नगरपालिका निवडणुकांचा बिगूल वाजल्यानंतर जिल्हा परिषदेची रणधुमाळी दोन महिन्यांनंतर सुरू होणार आहे.

आयुक्तांनी घेतली हरकतींवर सुनावणी
जिल्हा परिषद : अंतिम प्रभाग रचना व आरक्षण २५ नोव्हेंबरला होणार निश्चित
अमरावती : नगरपालिका निवडणुकांचा बिगूल वाजल्यानंतर जिल्हा परिषदेची रणधुमाळी दोन महिन्यांनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. जि.प आणि पं. स.च्या प्रभाग रचना व निर्धारित आरक्षणावर आक्षेप व हरकतींवर गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक राजकीय दिग्गजांचे उभे राहण्याचे मनसुबे उधळले. जिल्हा परिषदेच्या ५९ तर पंचायत समितीच्या ९८ मतदारसंघाचा प्रारुप प्रभाग रचनेस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण गित्ते यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. या प्रारुप प्रभागरचनेत विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर ५ आॅक्टोबरला आरक्षण सोडत काढण्यात आली. या प्रारुप प्रभाग रचना व आरक्षणावर जिल्हाधिकारी यांच्याकडे १० ते २० आॅक्टोबरदरम्यान हरकती व सूचना दाखल झाल्यात. दरम्यान या हरकतींवर १७ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त गुप्ता यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली. यावेळी उपायुक्त नरेंद्र फुलझेले, उपायुक्त झेंडे, नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, प्रमोद देशमुख, नवनाथ तायडे व संबंधित तहसीलदार उपस्थित होते.
जिल्हाभरातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गण रचना, आरक्षण आदी विषयावर प्रशासनाकडे ४१ आक्षेप व हरकती दाखल करण्यात आल्या होत्या, त्यानुसार विभागीय आयुक्तांना आक्षेप व हरकती दाखल करणाऱ्यांची सुनावणी प्रत्यक्ष घेवून त्यांची बाजू समजून घेतली आहे. या सुनावणी साठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, पदाधिकारी व राजकीय पुढारी विभागाीय आयुक्त कार्यालयात एकत्र आले होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आक्षेप व हरकती घेण्यात आलेल्या सुनावणीवर विभागीय आयुक्त यात काही उणीवा असल्यास प्रशासन व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार यावर सुनावणीअंती आयुक्त जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्णायक गण रचना अंतिम करणार आहेत. अंतिम प्रभाग रचना व आरक्षणाची २५ नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.त्यानंतरच याबाबत खरे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)