आरोग्यदायिनीच आजारांच्या विळख्यात
By Admin | Updated: November 6, 2014 22:48 IST2014-11-06T22:48:25+5:302014-11-06T22:48:25+5:30
गावातील आरोग्य उपकेंद्रात सेवा बजाविणाऱ्या आरोग्यदायीनींवर कामाचा ताण वाढल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनाच रक्तदाब, मधुमेह तसेच अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याची

आरोग्यदायिनीच आजारांच्या विळख्यात
मोहन राऊत - अमरावती
गावातील आरोग्य उपकेंद्रात सेवा बजाविणाऱ्या आरोग्यदायीनींवर कामाचा ताण वाढल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनाच रक्तदाब, मधुमेह तसेच अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़
जिल्ह्यात ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र तर ३३६ उपकेंद्र आहेत. या केंद्रात रूग्णांची सेवा जिल्ह्यातील ४०२ आरोग्य सेविका बजावतात. सध्या संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातल्याने या आरोग्य सेविका अधिक सतर्क झाल्या आहेत़ त्यांच्या दैनंदिन कामकाजांचा आढावा घेतला असता त्यांना वाढत्या धावपळीत स्वत:चे आरोग्य सांभाळणे कठीण झाले आहे़ नव्याने असांसर्गिक रूग्णांची जबाबदारी देखील आरोग्य सेविकांवर सोपविण्यात आली आहे.
रक्तदाब, कर्करोग ह्दयरोग, मधुमेह असे आजार असल्यास रूग्णांना औषोधपचार करण्यासाठी शहराच्या दवाखान्यात नेण्याचे काम त्यांना करावे लागते. ही कामे करताना त्यांना गावपुढाऱ्यांचा त्रास सोसावा लागतो, तो वेगळाच. उपकेंद्र बंद दिसले की थेट आरोग्य सेविकांची तक्रार तालुका पातळीवरच नव्हे तर जिल्हा पातळीवर करण्यात येते़ परंतु या मागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न प्रशासनाद्वारे केला जात नाही आणि थेट निलंबनाची कारवाई केली जाते. हा प्रकार अन्यायकारक असल्याचा सूर आरोग्य सेविकांमधून उमटत आहे.
वर्षाकाठी २ ते ३ हजार कागदपत्रे आरोग्य योजनेची कागदपत्रे तयार करणे, झेरॉक्स काढणे, औषधांची खरेदी करणे, इलेक्ट्रीक बिल भरणे, पाणीपट्टी भरणे ही कामे अल्प निधीमध्ये आरोग्य सेविकांना करावी लागतात. याकामी ग्रामस्थांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असा सूर आरोग्य सेविकांमधून उमटू लागला आहे. एकीकडे ग्रामपातळीवर आरोग्य सेविकांना असामाजीक घटक त्रास देतात तर दुसरीकडे प्रशासनही सहकार्य करीत नसल्याची त्यांची ओरड आहे.