मेळघाटातील आरोग्य यंत्रणेच्या इमारती डॉक्टरांअभावी पडल्या मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:09 IST2021-06-17T04:09:43+5:302021-06-17T04:09:43+5:30

फोटो - चिखलदरा आरोग्य डिस्पॅच चुनखडी येथील डॉक्टरांअभावी बंद असलेले उपकेंद्र 1)फोटो चुनखडी येथील डॉक्टर अभावी बंद असलेले उपकेंद्र ...

Health system buildings in Melghat collapsed due to lack of doctors | मेळघाटातील आरोग्य यंत्रणेच्या इमारती डॉक्टरांअभावी पडल्या मृत

मेळघाटातील आरोग्य यंत्रणेच्या इमारती डॉक्टरांअभावी पडल्या मृत

फोटो - चिखलदरा आरोग्य डिस्पॅच चुनखडी येथील डॉक्टरांअभावी बंद असलेले उपकेंद्र

1)फोटो चुनखडी येथील डॉक्टर अभावी बंद असलेले उपकेंद्र आरोग्य विभागाच्या रिक्त पदांचे ग्रहण आदिवासींच्या पाचवीला; खारी, चुनखडी केंद्र कुलूप बंद

नरेंद्र जावरे - चिखलदरा : कुपोषणासाठी सर्वत्र प्रसिद्ध असलेला मेळघाट कोरोनाकाळातही चर्चेत आला. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही आदिवासींना आरोग्य सुविधा पोहचविण्यात शासन-प्रशासन अपयशी ठरल्याचे वास्तव आहे. इमारती नव्या असल्या तरी त्यात जिवंतपणा आणण्यासाठी डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांची वानवा कायम आहे.

चिखलदरा तालुक्यातील आदिवासींना आरोग्य सुविधांचा लाभ देण्यासह पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याची सतत होणारे आव्हान ठरले आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या सव्वा लक्ष असून, चिखलदरा व चुरणी अशी दोन प्रत्येकी तीस खाटांची ग्रामीण रुग्णालये, हतरू, काटकुंभ, टेम्ब्रुसोंडा, सलोना, सेमाडोह ही पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुक्यात एकूण १४९ गावांचा समावेश असून, गौरखेडा बाजार, दहेन्द्री व रायपूर येथे प्राथमिक आरोग्य पथके, आकी, खारी व चुनखडीला फिरती पथके, एकताई येथे आयुर्वेदिक दवाखाना, तर वस्तापूर येथे ॲलोपॅथिक दवाखाना यामध्ये ११ भरारी पथके आणि तीनशेवर आरोग्य कर्मचारी कार्यरत असले तरी मोठ्या प्रमाणात रिक्त जागांअभावी उपचाराची बोंब आहे, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता पाहता, साधारण व गंभीर रुग्ण अचलपूर किंवा अमरावतीकरिता रेफर केले जातो. शंभर ते दीडशे किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर जिल्हा रुग्णालयात रुग्ण पोहोचतो. तीन ते चार तास उपचाराविना कालावधी निघून जात असल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे. पावसाळ्याच्या दिवसांत कुपोषित बालकांसह गर्भवती व स्तनदा माता यांच्या आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली गेली नाही, हे विशेष.

बॉक्स

चुनखडी, खारी केंद्र टाळेबंदी

काटककुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चुनखडी येथील आरोग्य फिरते पथक केंद्र १ मेपासून, तर खारी येथील केंद्र २० जुलै २०१९ पासून डॉक्टरांअभावी कुलूपबंद आहे. गत आठवड्यात आरोग्य संचालक वर्षा पाटील यांच्या दौऱ्या दरम्यान परिचारिका तेथे नेऊन केंद्र उघडण्याचा प्रकार घडला. मात्र, डॉक्टर अजूनपर्यंत पाठविण्यात आले नाहीत. या दोन्ही केंद्राशी १७ गावे संलग्नित आहेत. डॉक्‍रांच्या व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रकार सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, चुरणी ग्रामीण रुग्णालयात आहे, हे विशेष.

बॉक्स

म्हणून वळतात आदिवासी भुमकाकडे

मेळघाटातील आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आजही कायम आहे. कुठल्याही आजारावर गावातील मांत्रिकाकडून उपचार घेतला जातो. चिमुकल्यांच्या पोटावर गरम विळ्याचे चटके देणारा अघोरी डम्मा प्रकार ‘लोकमत’ने अनेकदा उघडकीस आणला. आरोग्य यंत्रणा रिक्त जागांअभावी कमकुवत पडत असल्याने मेळघाटातील आदिवासी अजूनही अंधश्रद्धेच्या खाईतच आहे. तालुक्यात २५० दायी व ३०० भुमका यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा आव तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी आणला. परंतु, त्यानंतर सर्व बंद पडले. शासनाने विशेष योजना आखून आरोग्य विभागाच्या समन्वयाने आदिवासींवर उपचाराची येथे गरज आहे.

बॉक्स

वर्षभरात अडीच हजारांवर प्रसूती

कुपोषण समूळ नष्ट करण्यासाठी १९९३ पासून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून योजना मेळघाटात आणण्यात आल्या. अनेक योजना कागदावरच राहिल्या. चिखलदरा तालुक्यात वर्षाला किमान अडीच हजारांवर प्रसूती होतात. त्यापैकी ७० टक्के प्रसूती दवाखान्यात होत असल्याचा दावा आरोग्य प्रशासनाचा असला तरी तीस टक्क्यांपेक्षा जास्त प्रसूती घरीच होत असल्यामुळे नवजात बालकांसह प्रसूत मातेच्या जिवाला धोका कायमच आहे.

कोट

तालुक्यात डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार असल्याचे शासनातर्फे सांगण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसांत मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.

- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा

Web Title: Health system buildings in Melghat collapsed due to lack of doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.