चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: September 20, 2015 00:32 IST2015-09-20T00:32:38+5:302015-09-20T00:32:38+5:30
महापालिका क्षेत्रातील ३३ ठिकाणी पाणी नमुने दूषित आढळल्याने शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात
महापालिका शाळेच्या पाण्यात ई-कोलाय : शासकीय प्रयोग शाळेचा अहवाल
वैभव बाबरेकर अमरावती
महापालिका क्षेत्रातील ३३ ठिकाणी पाणी नमुने दूषित आढळल्याने शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यातच नऊ शाळांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल शासकीय आरोग्य प्रयोगशाळेने दिल्यामुळे शेकडो चिमुकल्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
शहरात बहुतांश ठिकाणी दूषित पाण्याच्या प्रादुर्भावामुळे हजारो नागरिक आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. मात्र, पाणी तपासणीची तसदी घेण्यात शासकीय विभागात कुचराई केली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील अन्य खासगी रुग्णालयांमध्ये जलजन्य आजारांचे रुग्ण वाढत आहेत. गोरगरीब चिमुकल्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे दुषित पाण्याच्या आकडेवारीहून दिसून येत आहे. आॅगस्ट महिन्यात जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत महापालिकेकडून १७७ पाणी नमुन्यांची अनुजीव तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ३३ पाणी नमुने दूषित आढळून आले असून ते प्रमाण १९ टक्के आहे. महापालिकेकडून विविध शाळा-महाविद्यालये व हॉटेलमधील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये तब्बल ३३ ठिकाणी दूषित पाणी आढळून आले आहेत. आरोग्य प्रयोगशाळेत पाणी नमुन्यामध्ये ई-कोलिफाम जिवांणुच्या समूहाची तपासणी केली गेली. ई-कोलिफाम समुहात असणाऱ्या जिवांणुमुळे कॉलरा, टायफाईड, कावीळ, उलट्या व डायरियासारख्या आजार उद्भवू शकतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.