नांदगाववासीयांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: June 30, 2015 00:18 IST2015-06-30T00:18:30+5:302015-06-30T00:18:30+5:30
अनेक भागांत घाण साचली आहे. नाल्या तुंबल्या असून पाणी रस्त्यावरून वाहत आहे.

नांदगाववासीयांचे आरोग्य धोक्यात
घाणीचे साम्राज्य : विविध आजारांची लागण होण्याची शक्यता, प्रशासन सुस्त
नांदगाव खंडेश्वर : अनेक भागांत घाण साचली आहे. नाल्या तुंबल्या असून पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या डबक्यांमुळे निर्माण होणारे डास आणि जंतूंमुळे आजाराची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यांची सफाई, नाल्यातील घाण काढून त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची आहे. परंतु सफाईबाबतचे कोणतेही नियोजन नसल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गंभीर परिस्थितीत निर्माण झाली आहे.
सत्तावीस हजार लोकसंख्या असलेल्या या शहराची साफसफाईची जबाबदारी केवळ ४ सफाई कामगारांवर असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. सहाही प्रभागांत घाणीने तुंबलेल्या नाल्या व साचलेली घाण दिसून येते. वॉर्ड क्रमांक १, ४ व ६ मधील काही भागांची स्थिती अतिशय वाईट आहे. नालीतील पाण्यात शेवाळ तयार झाले आहे. घाणीच्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोखड रस्त्यावरील पाणीपुरवठ्याची विहीर बंद करावी. कारण गावातील सर्व घाण पाणी या विहीरीजवळ साचत आहे. त्यामुळे मुरलेले सर्व पाणी नेहमी दूषित राहते व हे थेट नागरिकांना पुरविले जाते. त्यामुळे नगारिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
ठोस उपाययोजनेची गरज
मुंगसाजी चौकातील मुख्य रस्त्यावर घाणपाणी तसेच डबके साचलेले आहेत. गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची ही स्थिती झाली आहे. या रस्त्याचे लोकप्रतिनिधींनी वर्षभरापूर्वी भूमिपूजन केल. मात्र अद्यापही रस्त्याची कामे प्रलंबित आहेत. कामे नगर पंचायतीने त्वरित सुरु करुन गैरसोय दूर करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
शोरीया कॉलनीत पावसाच्या पाण्याचे डबके नागरिकांच्या घरासमोर साचले आहेत. येथे सिमेंटचे पाईप टाकून पाणी वाहते करणे गरजेचे आहे. मागील कित्येक महिन्यांपासून चांदूररेल्वे मार्ग ते शोरीया कॉलनीतील मुख्य रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे. मात्र या कामाकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ही समस्या निकाली काढण्यात यावी.
- महेश दैत,
नागरिक.
गावातील नाल्या बुजल्या आहेत. विविध वॉर्डांतील सार्वजनिक नळाला तोट्या नाही. हजारो लिटर पाणी व्यर्व्थ जाते. गावातील उर्दू हायस्कूल समोरील घाणीचे साम्राज्य पसरले दिसते. गावातील शेणखताचे ढिगारे उचलावे, नागरिकांचे आरोग्य दुषित होऊ शकते.
-सुरेश तायडे,
आरोग्य कर्मचारी