खापरखेडा येथे आरोग्य विभागाच्या उपाययोजना सुरू
By Admin | Updated: September 20, 2014 23:42 IST2014-09-20T23:42:09+5:302014-09-20T23:42:09+5:30
खापरखेडा येथील डायरियाचे थैमान अखेर आटोक्यात आले आहे. कॅम्पमध्ये ३५ रूग्ण, कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रूग्णालयासह इतर ठिकाणी एकूण ८० गॅस्ट्रोने बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

खापरखेडा येथे आरोग्य विभागाच्या उपाययोजना सुरू
राजेश मालवीय - धारणी
खापरखेडा येथील डायरियाचे थैमान अखेर आटोक्यात आले आहे. कॅम्पमध्ये ३५ रूग्ण, कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रूग्णालयासह इतर ठिकाणी एकूण ८० गॅस्ट्रोने बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अतिगंभीर अवस्थेतील आदिवासी महिला जानकी पटेल (३५) हिला पुढील उपचारार्थ अमरावती येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
‘खापरखेड्यात डायरियाचे थैमान, चिमुकली दगावली’चे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच त्याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी आसोले, पंचायत समितीचे बीडीओ जोशी, पाणीपुरवठा उपअभियंता, १० वैद्यकीय अधिकारी, २० आरोग्य सेवक-सेविका, जिल्हा साथरोग अधिकारी, शिघ्र प्रतिसाद पथकासह गावात डेरेदाखल असून कॅम्पमधील ३५ रूग्णांसह इतर रूग्णांवर तातडीचे उपचार सुरू आहेत.
दोन हजार लोकवस्तीच्या खापरखेड्यात चार सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, ग्रामसचिव मालसच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात न आल्याने गावात दूषित पाणीपुरवठा सुरू होता. अशा दोन विहिरींना व पाण्याच्या टाकीला सील ठोकण्यात आले आहे. नजीकच्या दाबिदा येथून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात ६० अवैध नळ कनेक्शन असून नळाच्या ठिकाणी असलेले खड्डे शनिवारी बुजविण्यात आले आहेत. गावात साफसफाई व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी व आरोग्य विभागाची चमू औषधी साठ्यासह खापरखेडा येथे तळ ठोकून आहेत. अतिसाराच्या रुग्णांवर आवश्यक औषधोपचार आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. डायरियाने बाधित चिमुकलीचा नाहक बळी गेल्याने यासाठी जबाबदार ग्रामसचिवावर जिल्हा प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्याने आदिवासींनी तीव्र संताप व्यक्त केला.