मुख्यालयाची सक्ती; निवासस्थाने गळकी
By Admin | Updated: August 5, 2016 00:18 IST2016-08-05T00:18:45+5:302016-08-05T00:18:45+5:30
मेळघाटातील बिजुधावडी येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे क्वॉटर्स अतिशय शिकस्त झाले आहेत.

मुख्यालयाची सक्ती; निवासस्थाने गळकी
वैद्यकीय कर्मचारी हैराण : बिजुधावडी आरोग्य केंद्राच्या कर्मचारी क्वॉटर्सची दुर्दशा
अमरावती : मेळघाटातील बिजुधावडी येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे क्वॉटर्स अतिशय शिकस्त झाले आहेत. पावसाळ्यात तर या घरांमध्ये राहणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अतिशय हाल होतात. मात्र, जिल्हा परिषदेचे याकडे अतिशय दुर्लक्ष होत आहे.
मागील चार वर्षांपासून डॉक्टरांसाठी बांधण्यात आलेले हे क्वॉटर्स पावसाळ्यात गळतात. अशीच परिस्थिती सगळ्याच आरोग्य केंद्रात आहे. रस्ते, संरक्षण भिंतीचे काम केले जाते. परंतु डॉक्टरांच्या गळक्या निवासस्थानांची दुरूस्ती करण्याकडे कोणाचेच लक्ष नाही. या क्वॉटर्समध्ये पावसाचे पाणी शिरते. ते पाणी मुरत असल्याने एखादवेळी हे क्वॉर्टर्स कोसळू शकतात. असा अपघात घडल्यास त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनच जबाबदार राहील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेकडून या आरोग्य केंद्रातील रस्त्याचे खडीकरण अनेकदा करण्यात आले. संरक्षण भिंतही बांधण्यात आली. परंतु क्वॉटर्सची दुरूस्ती मात्र, करण्यात आलेली नाही.
याबाबत येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस.व्ही.निनावे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जुन्या क्वॉटर्सची दुरूस्ती करून पोस्टनुसार नवीन क्वॉटर्स तयार करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
निनावे या प्राथमिक आरोग्य केंद्रात सन १९९७ पासून सेवारत आहेत. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोेगशाळा तंत्रज्ञ पदासाठी क्वॉटर्सच नाही. एकीकडे मुख्यालयी राहण्याची सक्ती केली जाते. मात्र, निवासस्थानही धड नसताना येथे राहणार कसे, असा सवाल येथील डॉक्टरांनी केला आहे. (प्रतिनिधी)