मुख्याध्यापकांचे समायोजन होणार
By Admin | Updated: January 9, 2017 00:09 IST2017-01-09T00:09:14+5:302017-01-09T00:09:14+5:30
मुख्याध्यापकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेने अखेर वेग घेतला आहे. पात्र मुख्याध्यापकांचे समायोजन सोमवार १६ जानेवारीला जिल्हास्तरावर करण्यात येणार असून ...

मुख्याध्यापकांचे समायोजन होणार
१६ जानेवारीचा मुहूर्त : सीईओंनी दिले आदेश
अमरावती : मुख्याध्यापकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेने अखेर वेग घेतला आहे. पात्र मुख्याध्यापकांचे समायोजन सोमवार १६ जानेवारीला जिल्हास्तरावर करण्यात येणार असून राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
आरटीई २००९ तसेच पटनिर्धारणानुसार तयार करण्यात आलेल्या सन २०१६-१७ च्या संचमान्यतेनुसार मुख्याध्यापकांचे समायोजन करण्याचे आदेश शिक्षण विभागाद्वारा देण्यात आले. उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर राहण्याकरिता सेवाज्येष्ठता तथा बिंदुनामावलीनुसार पात्र ठरलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन प्रथम तालुकास्तरावर करण्यात येणार आहे. समायोजन करण्यापूर्वी १८ मे २०११ व २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयान्वये प्राधान्यक्रम ठरवून समायोजनाची यादी प्रसिद्ध करावी, असे कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उक्त शासन निर्णयातून मान्यताप्राप्त जिल्हास्तरीय शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, सेवानिवृत्तीला पाच वर्षे कालावधी शिल्लक असलेले शिक्षक, अपंग- मतिमंद व्यक्ती किंवा अशा मुलांचे पालक असलेल्या कर्मचाऱ्यांना वगळू नयेत. समुपदेशनाद्वारे सेवाज्येष्ठतेनुसार प्रथम प्राधान्य देत त्यांचे शक्यतोवर तालुक्यांतर्गत समायोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पंचायत समितीस्तरावर १२ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण तपशील शिक्षण विभागाला कळवावा लागणार आहे. १६ जानेवारीला दुपारी १ वाजता भातकुली पंचायत समितीच्या सभागृहात समायोजनाची प्रक्रिया राबविण्याचे आदेश सीईओ कुलकर्णी यांनी दिले असून यानुसार ही प्रक्रिया होणार आहे. (प्रतिनिधी)