वडाळा राजुरा रस्ता वाहनचालकांसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:13 IST2021-03-16T04:13:48+5:302021-03-16T04:13:48+5:30
कंत्राटदाराने काढला पळ, चार किमीचा एकेरी रस्ता राजुरा बाजार : वडाळा-राजुरा रस्त्याचे डागडुजीचे काम सहा महिन्यांपासून थंडबस्त्यात पडले आहे. ...

वडाळा राजुरा रस्ता वाहनचालकांसाठी डोकेदुखी
कंत्राटदाराने काढला पळ, चार किमीचा एकेरी रस्ता
राजुरा बाजार : वडाळा-राजुरा रस्त्याचे डागडुजीचे काम सहा महिन्यांपासून थंडबस्त्यात पडले आहे. ते काम अर्ध्यावर सोडून ठेकेदाराने पळ काढल्यामुळे मार्गक्रमण करताना वाहनचालकाच्या नाकात दम आणला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग वरूड अंतर्गत येणारा राज्य महामार्गाला लागून राजुरा- वडाळा रस्ता हा थेट नागपूर जिल्ह्यात थडीपवणीला प्रवेश घेतो. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील वाहतूक याच मार्गाने अतिशय वर्दळीची होते. राजुरा-वडाळा हा चार किलोमीटरचा एकेरी रस्ता आहे. या रस्त्याने अनेकदा छोटे-मोठे अपघात घडले आहेत. जड वाहनांमुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. सहा महिन्यांपासून डागडुजीचे काम सुरू असले तरी ३०० मीटरपर्यंत काम करून ठेकेदार पसार झालेला आहे. ठेकेदाराने कामावरील रस्त्याच्या बाजूला खडी, गिट्टी, डांबर टँक सोडून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. वडाळा-राजुरा येथील सामान्य नागरिक हैराण झाले आहे. ठिगळ लावण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी येथील त्रस्त नागरिकांनी व वाहनधारकांनी लावून धरली आहे.
कोट
अमरावती जिल्ह्याचे शेवटचे टोक असल्याने लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. डागडुजीबाबत संबंधित ठेकेदाराशी अनेकदा संपर्क साधला. परंतु संपर्कच होत नाही. या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती केली नाही. एखादी अप्रिय घटना घडल्यास याल कोण जबाबदार राहणार?
- नम्रता निकम,
सरपंच, वडाळा
कोट २
या रस्त्याची तक्रार आमदारांकडे केली आहे. या मार्गावरून नागपूरकडे जाणे सोयीचे असल्याने वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. त्यामुळे डागडुजी नव्हे तर भविष्यातील वाहतूक लक्षात घेता नव्याने दुपदरी रस्ता बांधणे गरजेचे झाले आहे.
- नीलिमा उमरकर,
सरपंच, थडीपवणी
कोट ३
वडाळा-राजुरा रस्ता नवीन बजेटमध्ये मंजूर झाला आहे. डागडुजीकरिता ठेकेदाराला समज देण्यात आली आहे. ठेकेदार लवकरच काम सुरू करेल.
- विजय भेलोंडे,
अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग, वरूड