स्वच्छता विभागप्रमुख, कनिष्ठ लिपिक निलंबित
By Admin | Updated: May 8, 2015 00:22 IST2015-05-08T00:22:36+5:302015-05-08T00:22:36+5:30
महापालिकेचे स्वच्छता प्रमुख देवेंद्र गुल्हाने आणि क्रीडा विभागात कनिष्ठ लिपिकपदी कार्यरत प्रशांत पवार यांच्यावर गुरूवारी आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली.

स्वच्छता विभागप्रमुख, कनिष्ठ लिपिक निलंबित
अमरावती : महापालिकेचे स्वच्छता प्रमुख देवेंद्र गुल्हाने आणि क्रीडा विभागात कनिष्ठ लिपिकपदी कार्यरत प्रशांत पवार यांच्यावर गुरूवारी आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली. यापूर्वी सांस्कृतिक भवनात आर्थिक अपहार झाल्याप्रकरणी आठ जणांवर फौजदारी दाखल झाली होती. आता दोघांचे निलंबन केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिका दरवर्षी स्वच्छता विभागावर ३८ कोटी रुपये खर्च करते. मात्र, या तुलनेत शहराची सफाई योग्य प्रकारे होत नाही, हे वास्तव आहे. दैनंदिन सफाईच्या कंत्राटात प्रचंड अनियमितता असल्याचे आयुक्त गुडेवार यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्तांनी काही प्रभागात भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांची झाडाझडतीदेखील घेतली आहे.
ंकागदपत्रात तफावत
अमरावती : काही प्रभागात सफाई कंत्राटदारांचे मजूरसुद्धा कमी असल्याने दिसून आले. दौऱ्यानंतर ज्या प्रभागात उणिवा आढळून आल्यात, त्या प्रभागातील कंत्राटदारांची देयके, कामांचा दर्जा तपासताना आयुक्तांनी अनेक बाबींवर बोट ठेवले. सफाईची कामे व्यवस्थित होत आहे की नाही, ही यंत्रणा तपासण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी व मोबाईल क्रमांकाचा डाटा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या नवीन प्रणालीत साफसफाईची कामे केवळ कागदावर दाखविण्यात आली. एवढेच नव्हे तर मोबाईल क्रमांक आणि नागरिकांची नावे देखील बनावट नोंदवून स्वच्छता विभागाने देयके सादर करण्याचा प्रताप केला. ही बाब स्वत: आयुक्तांनी तपासली तेव्हा मोबाईल क्रमांक इतर व्यक्तीचा तर नावे दुसऱ्यांची निदर्शनास आली. देयकात अनियमितता असल्याने खरेच त्या प्रभागात साफसफाईची कामे झालीत काय? हे ‘क्रॉस’ तपासण्याची जबाबदारी कर निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. नगरसेवकांचे सफाई कंत्राटात हस्तक्षेप आढळल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तयारीदेखील आयुक्त गुडेवार यांनी चालविली आहे. स्वच्छता विभागप्रमुख गुल्हाणे यांचे निलंबन करताना त्यांच्यावर देयकात अनियमितता असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच क्रीडा विभागात कनिष्ठ लिपिक पदी कार्यरत प्रशांत पवार यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना आणि कामात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेशाची प्रत देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)