'तो' बिबट्या उपद्रवी नव्हता म्हणून सोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST2022-02-13T05:00:00+5:302022-02-13T05:00:57+5:30
जंगलात सोडण्यापूर्वी म्हणे या बिबट्याचे चारित्र्य तपासले गेले. हा बिबट्या उपद्रवी नव्हता. मानव-वन्यजीव संघर्षात तो सहभागी नव्हता. तो चारित्र्यवान होता म्हणून त्याला सोडल्याचे सांगितले जात आहे. खरेतर वन्यजीवांमध्ये जंगलाचा राजा असलेल्या पट्टेवाल्या वाघाची एखादवेळी गॅरंटी देता येईल. पण, बिबट्यासारख्या लबाड प्राण्याची गॅरंटी दिली गेली हे मात्र नवलच.

'तो' बिबट्या उपद्रवी नव्हता म्हणून सोडला
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : औषधोपचारासाठी परतवाडा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला जखमी अवस्थेत दाखल कारंजा लाड वनपरिक्षेत्रातील त्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यास थोडी घाईच झाली. त्याची जखम पूर्णपणे बसलेली नव्हती. मेळघाटातील जंगलात त्याला सोडले गेले. म्हणे ती ओली जखम तो त्याच्या नैसर्गिक अधिवासात चाटून बरी करणार. पण जंगलात वावरताना ती जखम वाढल्यास त्यावर औषधोपचार कोण करणार आणि ती जखम चाटून बरी होणार होती तर मग ८० किलोमीटरचा प्रवास करून त्याला ट्रीटमेंट सेंटरला आणले कशाला?
दरम्यान, पूर्वानुभवाच्या आधारावर वन्यजीव अधिकाऱ्यांसह तज्ज्ञ अभ्यासकांच्या बैठकीत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. जंगलात सोडण्यापूर्वी म्हणे या बिबट्याचे चारित्र्य तपासले गेले. हा बिबट्या उपद्रवी नव्हता. मानव-वन्यजीव संघर्षात तो सहभागी नव्हता. तो चारित्र्यवान होता म्हणून त्याला सोडल्याचे सांगितले जात आहे. खरेतर वन्यजीवांमध्ये जंगलाचा राजा असलेल्या पट्टेवाल्या वाघाची एखादवेळी गॅरंटी देता येईल. पण, बिबट्यासारख्या लबाड प्राण्याची गॅरंटी दिली गेली हे मात्र नवलच.
मेळघाटातील वाघाच्या प्रदेशात सोडल्या गेलेल्या या जखमी बिबट्यावर देखरेख ठेवण्याची, त्याचे मॉनिटरिंग करण्याची कुठलीही तरतूद नाही. सेमाडोह वनपरिक्षेत्र अंतर्गत कारा गोलाई या अतिसंरक्षित क्षेत्रात सोडला गेलेला बिबट्या तीन दिवसात कुणालाही दिसलेला नाही. त्याच्या अस्तित्वाचे पुरावेही मिळालेले नाहीत.
ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला केवळ चार दिवस त्या बिबट्यावर औषधोपचार केला गेला. त्यातही अत्यंत गोपनीयता ठेवली गेली. या चार दिवसात त्या बिबट्याच्या प्रकृतीविषयी एकदाही वैद्यकीय बुलेटिन प्रसिद्धीस दिले नाही.
ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला बिबट्याचा मुक्काम पिंजऱ्यातून नाईट सेंटरला/ रात्र निवाऱ्यात हलविला गेला. तो तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले गेले. त्याची आक्रमकता बघता इतर दुखापती होऊ नये म्हणून म्हणे त्याला जंगलात सोडले.
जंगलात सोडण्यायोग्य झाल्याची खात्री केली नाही
खरेतर या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरला वाघाकरिता, बिबट्याच्या सोयीसाठी रात्र निवाऱ्यासह मोकळ्या वातावरणात, खुल्या जागेत, जाळीचे भले मोठे उंच आवरण असलेली ही जागा आहे. औषधोपचारानंतर तो वाघ किंवा बिबट किंवा अन्य वन्यजीव नैसर्गिक अधिवासात सोडण्याइतपत बरा झाला काय, याच्या पडताळणीकरिता ही जागा निवडली आहे. पण या मोकळ्या जागेत सोडून तो बिबट्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यायोग्य झाला काय याची पडताळणी झालीच नाही.