त्याने वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी केले पाणवठे, नाले स्वच्छ
By Admin | Updated: May 24, 2016 00:38 IST2016-05-24T00:38:21+5:302016-05-24T00:38:21+5:30
जगंलातील वन्यप्राण्याना स्वच्छ पाणी उपलब्ध होऊन त्यांची तृष्णातृप्ती व्हावी,...

त्याने वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी केले पाणवठे, नाले स्वच्छ
जलमित्र नीलेश कंचनपुरेचे कार्य : 'लोकमत' अभियानातून प्रेरणा
अमरावती : जगंलातील वन्यप्राण्याना स्वच्छ पाणी उपलब्ध होऊन त्यांची तृष्णातृप्ती व्हावी, या उद्देशाने वन्यप्रेमी निलेश कंचनपुरे याने जंगलातील पाणवठे व शहरालगत असलेल्या नाल्यांची स्वच्छता केली. सोबतच अनेकांच्या घरोघरी मातीचे भांडे देऊन पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली.
जेवड नगर नीलेश कंचनपुरेचे जन्मस्थान असून जंगलाच्या शेजारीच त्याचे लहानपण गेले. त्यामुळे त्याची वन्यप्राण्यांशी आत्मियता निर्माण झाली. लहानपणापासून जंगलातील पशुपक्ष्यांच्या सानिध्यात जीवन जगताना त्यांच्यासाठी काही करावे हा, उद्देश नीलेश कंचनपुरेचा होता. उन्हाळ्यात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कोरडे पडतात. अशाप्रसंगी वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती व्हावी, या उद्देशाने कंचनपुरेने तलावातील कोरड्या जागेवर खड्डे खोदून ठेवले. तसेच नैसर्गिक पाणवठ्यावरील काडी कचरा स्वच्छ करून वन्यप्राण्यासाठी शुध्द व स्वच्छ पाण्याची सोय केली. त्यातच नुकतेच छत्री तलाव मार्गावरील उद्यानाविषयी कंचनपुरेने आंदोलनसुध्दा केले. छत्री तलावात तहान भागविण्याकरिता येणाऱ्या वन्यप्राण्यांना उद्यानाचा अडथळा निर्माण होत असल्याचे कंचनपुरेने वनविभागाच्या लक्षात आणून दिले. वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता उद्यानाचे तारेचे कुंपण काढण्यात यावे, असा मुद्दा कंचनपुरेने प्रशासनाकडे रेटून धरला आहे. तसेच महापालिकेने शहरातील काही चौकांमध्ये सौंदर्यीकरणासाठी पाण्याचे फवारे लावले आहेत. पाणी बचतीसाठी उन्हाळ्याच्या दिवसांत ते फवारे बंद करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेकडे याने केली आहे. 'लोकमत'ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानातून प्रेरणेतून पाणी बचतीचे कार्य करणारा व वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी झटणारा कंचनपुरे हा जलमित्र ठरला आहे. (प्रतिनिधी)