मुक्या-बहिऱ्या पत्नीवर त्याने केले ३४ वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:54+5:30
तालुक्यातील हिरूळपूर्णा येथे ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रमिला पारधी या विवाहितेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यानंतर लागलीच आरोपी पती आशिष पारधी यास अटक करण्यात आली होती. दुसरीकडे प्रमिलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोटाचे आतडे बाहेर पडलेल्या सात महिने वयाच्या देवानंद ऊर्फ ओंकार या प्रमिला व आशिष यांच्या चिमुकल्यास अमरावतीला हलविण्यात आले होते.

मुक्या-बहिऱ्या पत्नीवर त्याने केले ३४ वार
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : चारित्र्यावर संशय घेऊन मूकबधिर पत्नीची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने हिरूळपूर्णा या छोट्याशा गावात स्मशानशांतता पसरली आहे. आरोपी आशिष पारधी याने पत्नी प्रमिला हिच्यावर विळ्याने तब्बल ३४ वार केल्याची माहिती शवविच्छेदनानंतर उघड झाली असून, त्या नराधमाने पोटच्या चिमुकल्यावरही आठ वार केलेत. मात्र, त्याने मृत्यूशी यशस्वी झुंज दिली. दरम्यान, आरोपीला शुक्रवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तालुक्यातील हिरूळपूर्णा येथे ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रमिला पारधी या विवाहितेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यानंतर लागलीच आरोपी पती आशिष पारधी यास अटक करण्यात आली होती. दुसरीकडे प्रमिलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोटाचे आतडे बाहेर पडलेल्या सात महिने वयाच्या देवानंद ऊर्फ ओंकार या प्रमिला व आशिष यांच्या चिमुकल्यास अमरावतीला हलविण्यात आले होते.
बोरगाव मोहना येथील जन्मत: मूकबधिर प्रमिलाचा विवाह तीन वर्षांपूर्वी हिरूळपूर्णाच्या आशिष पारधी याच्याशी झाला. त्या दाम्पत्याला सात महिन्यांपूर्वी गोंडस बाळ झाले. मात्र, आरोपी आशिषच्या मनात संशयाचे भूत निर्माण झाले. त्यांच्यात खटके उडू लागले. मूकबधिर असली तरी प्रमिलाला परिस्थितीचे भान तिला होते. तिने आईला घरी बोलावून घेतले होते.
आशिषने ३० ऑक्टोबरच्या रात्री प्रमिलास शिवीगाळ केली. त्यामुळे सासू त्याच्या भावाकडे निघून गेली. यानंतर त्याने पत्नीवर अत्यंत क्रूरपणे विळ्याने वार केले. प्रमिलाच्या सर्वांगावर ३४ वार होते. ती मूक असल्याने तिची तडफड, जिवाचा आकांत कुणाच्याही लक्षात आलाच नाही. तेवढ्यावरच न थांबता आशिषने पोटच्या गोळ्यावर विळ्याने आठ वार केलेत.
चिमुकल्याची प्रकृती स्थिर
माथेफिरू वडिलाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सात महिने वयाच्या देवानंद ऊर्फ ओंकारवर गुरुवारी अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी ती जबाबदारी स्वीकारत आपल्या तज्ज्ञ चमूकडून त्याचेवर शस्त्रक्रिया करवून घेतली. त्या चिमुकल्याची संपूर्ण देखरेखीसाठी दोन परिचारिकांची नियुक्ती केली. आता त्या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.