‘He’ corona positive from Mumbai | मुंबईहून परतलेला ‘तो’ कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईहून परतलेला ‘तो’ कोरोना पॉझिटिव्ह

ठळक मुद्देकाकडा सील : दर्यापूरला अलर्ट, क्वारंटाइन व्यक्तींना रुग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील काकडा येथील एका ३० वर्षीय रुग्णाचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक मुंबईहून २१ मे रोजी काकड्यात दाखल झाला होता. गावातील ग्रामपंचायतलगत असलेल्या जनाबाई नाथे विद्यालयात तो क्वारंटाइन होता. २५,२६ व २७ मे रोजी त्याला तापासह अन्य त्रास जाणवू लागला. २९ मे रोजी अमरावतीच्या कोविड रुग्णालयात त्याला हलविले गेले. तेथे त्याचा थ्रोट स्वॅब घेतला गेला. तो अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आला.
३० वर्षीय युवक ज्या खोलीत क्वारंटाईन होता, तेथील अन्य एकाला अमरावतीला, तर दुसऱ्या खोलीतील सात लोकांना परतवाडा येथील डेडिकेटेड कोविड रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोना संक्रमित युवक व दर्यापूर तालुक्यातील शिवर या गावातील आठ जण एका वाहनाने मुंबईहून परतले होते. मात्र, युवकासह क्वारंटाइन सेंटरवरील कुणाचाही गावाशी संपर्क आलेला नाही. ते गावात फिरले नाहीत. तरीसुद्धा खबरदारीची उपाययोजना म्हणून गाव सील करण्यात आले आहे. क्वारंटाइन सेंटरच्या शालेय परिसरासह लगतचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. क्वारंटाइन सेंटरसह गावात निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबविली जात आहे. औषधांची फवारणी होत आहे. क्वारंटाइन असणाऱ्यांची तपासणी आरोग्य पथकांकडून केली जात आहे. अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी जयंत बाबरे, तालुका आरोग्य अधिकारी किरण शिंदे, पथ्रोटचे ठाणेदार चौधरी, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक वैशाली कोठवालसह तालुका प्रशासन गावात दाखल झाले आहेत.

युवकासमवेत दर्यापूर तालुक्यातील सहा युवक एका वाहनाने मुंबईहून आले आहेत. या सहा लोकांची माहिती दर्यापूर प्रशासनाला देण्यात आली आहे. मुंबईहून आल्यापासून तो युवक क्वारंटाइन असून, त्याचा गावाशी संपर्क आलेला नाही.
- मदन जाधव
तहसीलदार, अचलपूर

 

Web Title: ‘He’ corona positive from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.