आईनंतर त्यानेही घेतला जगाचा निरोप, प्रयत्न पडले थिटे
By Admin | Updated: August 10, 2014 22:43 IST2014-08-10T22:43:53+5:302014-08-10T22:43:53+5:30
मेळघाटात बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या शेकडो योजनांद्वारे होत असलेला कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरत असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. बाळ जन्मत:च माता दगावली. आईविना ते कुपोषित

आईनंतर त्यानेही घेतला जगाचा निरोप, प्रयत्न पडले थिटे
उपचाराचा अभाव : मेळघाटात कोवळी पानगळ सुरूच
नरेंद्र जावरे - चिखलदरा
मेळघाटात बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या शेकडो योजनांद्वारे होत असलेला कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरत असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. बाळ जन्मत:च माता दगावली. आईविना ते कुपोषित बालक अडीच महिने जिवंत राहिले. मात्र वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने शनिवारी रात्री १ वाजता त्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
मनीष मनिराम कास्देकर (अडीच महिने, रा. सोनापूर, ता. चिखलदरा) असे मृत बालकाचे नाव आहे. मे महिन्यात सुंदर मनिराम कास्देकर या गर्भवती असताना प्रसूतीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर, परिचारिका व एम. पी. डब्ल्यूने तिला प्रसुतीपूर्वी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. तिला टेंब्रुसोंडा आरोग्य केंद्र व तेथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले परंतु ती प्रसूतीसाठी घरीच आली. प्रसूतीच्या असह्य वेदना सहन करीत तिने गोंडस बाळाला जन्म दिला आणि यात दरम्यान तिचा मृत्यू झाला. आईविना मनीषची देखभाल वडील, आजी, आजोबांनी केली. त्याला गाईचे दूध मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात आला; मात्र गाईचे दूध मिळत नसल्याने अखेर म्हशीचे दूध देऊन त्याची भूक भागविण्याचा प्रयत्न केला. पण त्याला म्हशीचे दूध पचत नव्हते. त्यामुळे अडीच महिन्यांत त्याची प्रकृती अनेकवेळा खालावली.
दरम्यान येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करून त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी आर. व्ही. लोणारे, परिचारिका शुभांगी पोहेकर, रितेश धवने यांनी या बाळाला शनिवारी सायंकाळी ६ वाजता टेंब्रुसोंडा आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु प्रकृतीत सुधारणार होत नसल्यामुळे तेथून त्याला अचलपूर व जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा १ वाजता मृत्यू झाला. मनीषच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.