हातुर्णा ग्रामस्थांचे ‘शोले आंदोलन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST2020-12-04T04:34:43+5:302020-12-04T04:34:43+5:30
पान २ चे सेकंड लिड २९ वर्षांपासून रखडले पुनर्वसन : राजुरा बाजार : सन १९९१ च्या महापुरात वाहून गेलेल्या ...

हातुर्णा ग्रामस्थांचे ‘शोले आंदोलन’
पान २ चे सेकंड लिड
२९ वर्षांपासून रखडले पुनर्वसन :
राजुरा बाजार : सन १९९१ च्या महापुरात वाहून गेलेल्या घरांचे पुनर्वसन अद्यापही झाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर हातुर्णा ग्रामस्थांनी बुधवारी गावातील टाकीवर चढून ‘शोले आंदोलन’ केले.
सन १९९१ साली वर्धा नदीला आलेल्या पुराचा हातुर्णा गावातील नागरिकांना जबर फटका बसला. या पुरात अनेक घरे वाहून गेली. यावेळी हातुर्णा येथील १६९ नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. कालांतराने तेथील शासकीय जमिनीवर पट्टेसुद्धा पाडण्यात आले. मात्र २९ वर्षांनंतर प्रत्यक्षात १६९ पुनर्वसित नागरिकांना पट्यांचे वाटप झालेले नाही. पट्टे न मिळाल्याने पुरात खचलेल्या घरात राहणे नागरिकांच्या नशिबी आले. अनेकांची राहती घरे खचली, पडली, काही नागरिक गावातच जागा मिळेल तिथे राहत आहेत. कुणी भाड्याच्या घरात राहत आहे.
प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्याने अखेर बुधवारी सकाळी ११ वाजतापासून आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढले. या आंदोलनाची माहिती मिळाल्याने नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक पाण्याच्या टाकीखाली येण्यास तयार नसल्याने चर्चा होऊ शकली नाही. त्या माघारी परतल्या. यावेळी बेनोडा शहीदचे ठाणेदार मिलिंद सरकटे, उपनिरीक्षक गणपत पुपुलवार यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. अखेर उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांनी हातुर्णा गाठून आंदोलनकर्त्यांना पुनर्वसनासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला. त्यावर सांगोपांग चर्चा झाली. त्यानंतर सायंकाळी आंदोलनकर्ते खाली उतरले.
या आंदोलनात विनोद ठाकरे, पंकज ठाकरे, हर्षल ठाकरे, मंगेश कोरडे, मनोहर रामटेके, नामदेव पेठे, सचिन पेठे, सारंग ठाकरे, जानराव चौधरी, दीपक पोहणे, सुरेश ठाकरे, दीपक ठाकरे, रामेश्वर अलोणे, श्रीराम घागरे, मधुकर गावंडे, सुनील गावंडे, शालिक धुर्वे, सुरेंद्र घाटोळे, सचिन पेठे, ज्योती गजानन ठाकरे, निर्मला चौधरी, कुसुंम ठाकरे यांचेसह असंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.
कोट
आम्ही तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदने दिली. अनेक बैठकी झाल्यात. स्थानिक प्रशासनाने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे. योग्य पुनर्वसनासाठी आता आरपारची लढाई लढू.
विनोद ठाकरे
आंदोलक, हातुर्णा