नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावरच
By Admin | Updated: August 28, 2014 23:30 IST2014-08-28T23:30:02+5:302014-08-28T23:30:02+5:30
२७ जुलै रोजी झालेल्या तालुक्यातील पूर्णा व चारघड नदीच्या महापुराने शेती व संत्राबागा उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे युद्धपातळीवर सर्वेक्षण झाले. मात्र, त्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई अद्यापही

नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावरच
सुरेश सवळे - चांदूरबाजार
२७ जुलै रोजी झालेल्या तालुक्यातील पूर्णा व चारघड नदीच्या महापुराने शेती व संत्राबागा उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे युद्धपातळीवर सर्वेक्षण झाले. मात्र, त्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई अद्यापही त्यांच्या हातात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एका नुकसानग्रस्त घाटलाडकीच्या गुलाम रसूल शेख नजीर या शेतकऱ्याने आपल्या संकटाची जाणीव एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना केली असून जगावे की मरावे, या प्रश्नाचे उत्तर मागविले आहे.
गुलाम रसूल यांचे शेत घाटलाडकी परिसरातील वारोळी शिवारात आहे. २७ जुलै रोजी चारघड धरण ओव्हरफ्लो झाल्याने नदीच्या महापुराने त्यांची शेती पूर्णपणे अस्तित्वहीन झाली आहे. या महापुरात त्यांचे शेतातील १० ते १७ वर्षांची ४५० संत्रा झाडे उद्ध्वस्त झालीत. त्यात त्यांच्या २ लाखांचा आंबिया बहराची फळे व मृगबहर नष्ट झाला. शेतातील कपाशी, तूर पिकाचे नुकसान झाले. बँकेचे कर्ज घेऊन सिंचनासाठी खरेदी केलेल्या ठिबक सिंचनाचे साहित्य, संत्रा झाडाच्या संरक्षणासाठी भाडेपट्ट्यावर आणलेले दोन हजार बासे या व्यतिरिक्त शेतीच्या जोडधंदा दोन म्हशी या चारगडच्या महापुरात वाहून गेल्या आहेत.
बँकेचे कर्ज घेऊन उभारलेली खरिपाची पिके चारगडच्या नैसर्गिक संकटाने उद्ध्वस्थ झाल्यामुळे उपजिविकेचे साधनच नष्ट झाले. तालुक्यातील नुकसानीसह या महापुराने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण युद्धपातळीवर करून अहवाल १५ दिवसांपूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्यापही यावर शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने पूरग्रस्त शेतकरी संकटात सापडले आहेत. तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे