परप्रांतीय आंब्याचा बोलबाला : अवकाळी पावसाने उत्पादन घसरलेलोकमत विशेषअमरावती : उन्हाळा सुरु होताच बाजारपेठेत विविध जातीचे आंबे विक्रीसाठी दाखल होतात. मात्र, यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात रत्नागिरीचा हापूस बाजारात दाखल झाला असला तरी तो खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर होते. त्यामुळे काही ठराविक घटकांनीच हापूसची चव चाखली. आता एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबे विक्रीसाठी आले असून यात परप्रांतिय आंब्यांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादनाला बसल्याची माहिती आहे.सध्या स्थानिक फळबाजारात बंगळूर, आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ या राज्यात उत्पादित होणारे आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी मागविले जात आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात दरदिवसाला पाच ते सहा ट्रक आंबे येत असून जिल्हाभरातील घाऊक फळविक्रेते त्यांची खरेदी करीत आहेत, अशी माहिती ठोक आंबा विके्रते अ. रज्जाक अ. रफिक यांनी दिली. कार्बाईडने आंबे पिकविण्यावर बंदी असल्याने त्याचा थोडाफार परिणाम व्यवसायावर जाणवतो आहे. परंतु नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे विकण्याची तयारी आहे. या नैसर्गिक प्रक्रियेसाठी तीन ते चार दिवस आंबे साठवून ठेवावे लागतात. अन्न व औषधी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे सर्वच घाऊक आंबा विक्रेत्यांना कळविण्यात आले आहे. विष प्रयोग केल्याचे गुन्हे दाखल करुन घेतल्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने पिकलेले आंबे आता नागरिकांना विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विक्रेते अ. रज्जाक यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. काही दिवसांपुर्वी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळाने आंबे उत्पादनावर चांगलाच फटका बसला आहे. परप्रांतातून अमरावतीच्या बाजारपेठेत येणारे आंबे हे डागयुक्त असल्याने या आंब्याना भाव मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गावरान आंबे दुर्मिळ झाले असून हल्ली परप्रांतीय आंब्यावरच अवलंबून राहावे लागत आहे, असे अ. रज्जाक म्हणाले.घाऊक बाजारात बंगळूरचा हापूस प्रती किलो १०० रुपये दराने विकला जात आहे. तसेच केरळचा गुलाबखस १०० ते १२० रुपये, लालबाग ५० ते ६० रुपये तर आंध्रप्रदेशचा दशेरी ५० ते ६० रुपये, तोतापुरी ३० ते ४० रुपये, लंगडा ५० ते ६० रुपये प्रती किलो दराने विकला जात आहे. तसेच रत्नागिरी व देवगडचा हापूस प्रती डझन ५०० ते ८०० रुपये दराने विक्री होेत असल्याची माहिती अमर फ्रूट भंडारच्या संचालकांनी दिली. मे महिन्यात उत्तरप्रदेशातील लालबाग, केसर तर आंध्रप्रदेशातील बैगनपल्ली विक्रीसाठी येतील, अशी माहिती आहे. रत्नागिरीचा हापूस सामान्यांना खरेदी करणे कठीण असल्याने बहुतांश लोक बंगळूरचा हापूस खरेदी करुन आंब्याची चव चाखत आहेत. फळबाजारातील चित्र बघितले तर हापूस, गुलाबखस, लालबाग, दशेरी, लंगडा जातीच्या आंब्यांना मागणी आहे. एकूण अमरावतीकरांना परप्रांतीय आंब्यावरच निर्भर रहावे लागत आहे.मे महिन्यात हापूसचे दर घसरण्याची शक्यताहल्ली फळबाजारात रत्नागिरी, देवगडचा हापूस भाव खाऊन जात आहे. ५०० ते ८०० रुपये प्रती डझन दराने हापूस आंबे विकले जात आहे. मात्र, मे महिन्यात अन्य राज्यातून आंब्याची आवक वाढली की, हापूस आंब्याचे दर प्रती डझन २०० ते ३०० रुपयांनी घरसण होईल, अशी माहिती फळ विक्रते राजा मोटवानी यांनी दिली. हापूस प्रारंभी एक हजार रुपये प्रती डझन दराने विकण्यात आला आहे, हे विशेष.
हापूस, गुलाबखस, दशेरीची धूम
By admin | Updated: April 28, 2015 00:15 IST