स्वच्छ शाळेसाठी ‘हॅन्ड वॉश स्टेशन’ मस्ट !
By Admin | Updated: July 19, 2016 00:07 IST2016-07-19T00:07:45+5:302016-07-19T00:07:45+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्काराची घोषणा झाली. त्यासाठी नामांकनाची धांदल उडाली आहे.

स्वच्छ शाळेसाठी ‘हॅन्ड वॉश स्टेशन’ मस्ट !
निकषांची चतु:सूत्री : राज्यभरात स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजना
अमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्काराची घोषणा झाली. त्यासाठी नामांकनाची धांदल उडाली आहे. जिल्हास्तरावर ४८, राज्यस्तरावर ४० तर राष्ट्रीय पातळीवर एकूण शंभर शाळांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. आहारापूर्वी हात धुण्यासाठी शाळेत हॅन्डवॉश स्टेशन असणे आणि त्यातही सात पातळ्यांवर या हात धुण्याची प्रक्रिया, हा पुरस्कारासाठी प्रमुख निकष राहणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘हात धुवादिन’ ही संकल्पना राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. तथापि अनेक शाळांमध्ये केवळ औपचारिक अंमलबजावणी करण्यात आली. पुरस्कार पटकाविण्यासाठी मात्र ‘हॅन्ड वॉश स्टेशन’ असणे बंधनकारक आहे. शासकीय व अनुदानास पात्र शाळांनाच नामांकन नोंदवता येणार आहेत. आॅक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था आणि वर्तणूक व क्षमता विकास या पाच विभागात एकूण ३५ घटकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत नामांकन पाठवायची असून एमएचआरडीच्या संकेतस्थळावर दिलेल्या मोबाईल नंबरवर मिसकॉल दिल्यास त्या शाळांना प्रश्नावली उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर तीन समित्या स्थापन केल्या असून गुणांचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना विविध रंगनिहाय श्रेणी दिली जाणार आहे. ३५ पेक्षा कमी गुण मिळणाऱ्या शाळांना लाल रंगाची तर ९० ते १०० गुण मिळवणाऱ्या शाळांना हिरव्या रंगाची श्रेणी असेल. ७५ ते ८९ गुण मिळणाऱ्या शाळांना निळ्या ५१ ते ७४ गुण मिळविणाऱ्या शाळांना पिवळा तर ३५ ते ५० गुण मिळणाऱ्या शाळांना नारंगी रंगाची श्रेणी असेल. ग्रामीण भागातील ७० टक्के शाळा आणि शहरी भागातील ३० टक्के शाळांचा पुरस्कारासाठी विचार होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत राज्यस्तरावरील तर ७ आॅक्टोबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण होणार आहे. (प्रतिनिधी)
हात धुवा कशासाठी ?
जगभरातील लहान मुलांना हात धुण्याची सवय लागावी, हात धुणे हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावा आणि त्यांनी स्वच्छता पाळून आजाराला प्रतिबंध घालावा, या उद्देशाने १५ आॅक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन (ग्लोबल हॅन्ड वॉशिंग डे) म्हणून साजरा होतो. जगात पहिल्यांदा १५ आॅक्टोबर २००८ ला हा दिवस साजरा झाला. विषाणू तसेच डायरियामुळे होणारे बालमृत्यू कमी करणे हा देखील या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.