वडाळी-पोहरा जंगलात सोलर ऊर्जेवर हातपंप
By Admin | Updated: March 16, 2017 00:04 IST2017-03-16T00:04:57+5:302017-03-16T00:04:57+5:30
शहरानजीकच्या वडाळी- पोहरा जंगलात वन्यपशुंची तृष्णा भागविण्यासाठी सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविण्यात आले आहेत.

वडाळी-पोहरा जंगलात सोलर ऊर्जेवर हातपंप
अभिनव उपक्रम : वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी वनविभाग सरसावला
अमरावती : शहरानजीकच्या वडाळी- पोहरा जंगलात वन्यपशुंची तृष्णा भागविण्यासाठी सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविण्यात आले आहेत. त्याकरीता पाच लाख रूपये खर्च करण्यात आला असून जंगलात पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. परिणामी उन्हाळ्यात वन्यपशुंसमोर उद्भवणाऱ्या पाणीप्रश्नावर मात करण्यात वनविभागाला यश आले आहे.
सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यान्वित असून या सोलरपंपामुळे वन्यपशुंंच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. वडाळी-पोहरा जंगलात वाघ, बिबट, हरिण, रानडुक्कर, वाघ, चितळ, माकड आदी वन्यपशुंसह पक्ष्यांची मोठी संख्या आहे. मात्र, वडाळी-पोहरा जंंगलात पाण्याचे स्त्रोत कमी असल्यामुळे वन्यपशुंना पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागते. सध्या जेमतेम उन्हाळा सुरु झाला असतानाही जंगलातील पाणवठे पाणी आटू लागले आहेत. त्यामुळे वडाळी जंगलातील भवानी तलाव परिसर, पोहरा, चिरोडी याभागात हातपंप आणि सोलरपंप बसविण्यात आले आहेत. पोहरा, चिरोडी व वडाळी भागात वन्यपशुंची मोठी वर्दळ राहात असल्यामुळे ही जागा वन्यपशुंची तृष्णा भागविण्यासाठी हातपंप बसविण्यासाठी निवडण्यात आली आहे. हे सोलरपंप स्वयंचलित असून सूर्यप्रकाश असेपर्यंत हातपंपाद्वारे पाणी सुरु राहते. वन्यपशुंसाठी नव्याने पाणवठे तयार करण्यात आले आहेत. सोलरपंपाद्वारे हातपंपातून पाणी पाणवठ्यात सोडण्याचीे व्यवस्था करण्यात आली आहे. सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविण्यासाठी वन्यजीव संरक्षणांतर्गत पाणवठे तयार करण्यासाठी प्राप्त निधीतून पाच लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. वडाळी-पोहरा जंगलात सोलर ऊर्जेच्या हातपंपाचा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य ठिकाणी हातपंप बसविले जाणार आहेत. यापूर्वी पोहरा-चिरोडी जंगलात हातपंप बसविण्यात आले आहेत. उन्हाळ्यात वन्यपशुंची पाण्यासाठी होणारी वणवण यामुळे थांबणार आहे.
स्वयंचलित आहे हातपंप
वडाळी जंगलात सोलर ऊर्जेवर बसविले जाणारे हातपंप स्वयंचलित राहणार आहेत. त्यानुसार वनविभागाने निविदा देखील काढल्या होत्या. नामांकित कंपनीचे सोलर पंप असून हातपंपाचा दर्जा चांगला आहे. या पंपांची किमान दोन ते तीन वर्षांची वॉरंटी आहे. यानव्या प्रयोगामुळे वन्यपशुंची तृष्णा भागविण्यासाठी कर्मचाऱ्यांवर येणारा ताण देखील कमी झाला आहे.
एक सोलर सेट आणि हातपंप बसविण्यात आला आहे. वन्यपशू संरक्षणांतर्गत पाणवठे तयार करण्यासाठी प्राप्त निधीतून सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविले आहेत. पोहरा येथे नव्याने प्रस्तावित आहे.
- विनोद कोहळे, वनपाल, पोहरा