लब्धप्रतिष्ठितांच्या अनधिकृत बांधकामावर गुरुवारी हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2016 00:18 IST2016-10-11T00:18:52+5:302016-10-11T00:18:52+5:30
व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या २२ लब्धप्रतिष्ठितांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे.

लब्धप्रतिष्ठितांच्या अनधिकृत बांधकामावर गुरुवारी हातोडा
पाडण्याचा खर्चही वसूलणार : कर आकारणी दुप्पट
अमरावती : व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या २२ लब्धप्रतिष्ठितांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे. या २२ संकुलातील पार्किंगच्या ठिकाणी केलेले अनधिकृत बांधकाम गुरुवारी पाडण्यात येणार आहे. ही मोहीम गुरुवारपासून सुरू होणार असल्याची माहिती यंत्रणाप्रमुखांनी दिली आहे.
बांधकाम पाडण्याचा खर्च संबंधित संकूलधारकांकडून वसूल केला जाणार आहे. ज्या २२ संकुलांतील पार्किंगच्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले आहे, त्यात हमालपुरा झोनमधील ६, बडनेरा झोनमधील ५ आणि भाजीबाजार झोनमधील ११ संकुलांचा समावेश आहे.
व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगसाठी परवानगी नसताना काही व्यापाऱ्यांनी पार्किंगच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर झोन अभियंत्यांमार्फत तपासणी मोहीम राबविण्यात आली. ३४० मालमत्ताधारकांना नोटीसही देण्यात आल्यात. पार्किंगसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यासाठी विहित कालावधी देण्यात आला.
नोटीसला अनुसरून १०७ मालमत्ताधारकांनी कागदपत्रे सादर केली आहेत. १०७ मालमत्तापैकी ३३ मालमत्तांची तपासणी करण्यात आली. त्यात २२ ठिकाणी पार्किंगचे बांधकाम अनधिकृत जागेवर केल्याचे आढळून आले. पुढील दोन आठवड्यांत या २२ ठिकाणची पार्किंग मोकळी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत. त्याची सुरुवात दसऱ्यानंतर लगेचच केली जाणार आहे. ज्या २२ व्यापारी संकुलात मंजुरी व्यतिरिक्त बांधकाम केले आहे. याप्रकरणी अतिक्रमण विभागाशी संपर्क साधून पार्किंगच्या जागेतील बांधकाम काढण्याचे आदेश सहायक संचालक नगररचना यांनी संबंधित झोनच्या अभियंत्यांना दिले आहेत.
दुप्पट दंड
महापालिकेची परवानगी न घेता पार्किंगच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून ती जागा हडपणाऱ्या संकुलधारकांकडून दुप्पट दंड वसूल केला जाणार आहे. याबाबत महापालिकेच्या कर विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. संबंभित झोन स्तरावरून ही कारवाई केली जाईल.