आधी राष्ट्रगीत; मगच दैनंदिन कामकाज सुरू
By Admin | Updated: June 26, 2017 00:14 IST2017-06-26T00:14:49+5:302017-06-26T00:14:49+5:30
नगरपालिकेतील कर्मचारी पूर्वी लेटलतीफ ठरत होते. पण नवनिर्वाचित मुख्यधिकारी गीता वंजारी यांनी पदभार स्वीकारताच....

आधी राष्ट्रगीत; मगच दैनंदिन कामकाज सुरू
आदर्श उपक्रम : दर्यापूर पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना लावली शिस्त
सचिन मानकर। लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : नगरपालिकेतील कर्मचारी पूर्वी लेटलतीफ ठरत होते. पण नवनिर्वाचित मुख्यधिकारी गीता वंजारी यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी कर्मचाऱ्यांना सकाळी १० च्या ठोक्याला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रोज राष्ट्रगीत झाल्यानंतर नगरपालिकेच्या कामकाजाची सुरूवात व्हावी, असा एक नवा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. या उपक्रमाचे नगराध्यक्षा नलिनी भारसाकळे यांनी स्वागत केले आहे.
कर्मचाऱ्यांना वेळवर येण्याची शिस्त लागावी म्हणून दर्यापूर नगरपालिकेच्या मुख्यधिकारी गीता वंजारी या सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात हजर होऊन स्वत: शिस्तीचे पालन करतात. राष्ट्रगीताला हजर राहण्याकरिता येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांची धडपड सुरू होते. पालिकेत राष्ट्रगीत झाल्यानंतरच कामकाजाला सुरुवात होते. कर्मचारीसुध्दा लगेच आपआपल्या दालनात जातात. यामुळे येथील कर्मचाऱ्यांचा विश्वास वाढला आहे. रोज देशभक्तीचे नारेसुध्दा लावले जात आहे. एवढेच नाही, तर यानंतर होणाऱ्या मासिक सभासुध्दा राष्ट्रगीत म्हणूनच सुुरू करण्यात येईल, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सर्व सदस्यांनीसुध्दा या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे दर्यापूर नगरपालिकेत एक शिस्तप्रिय खेळीमेळीचे वातावरण तयार झाले आहे. राष्ट्रगीताने कामकाजाची सुरुवात करणे ही राज्यातील पहिलीचे नगरपालिका असेल की हा निर्णय झाला आहे. त्यामुळे नागरिकांनीही या कार्याचे स्वागत केले आहे.
कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्याची शिस्त लागावी व नगरपालिकेच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी, या हेतुनेच हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व कर्मचारी १० च्या ठोक्याला हजर राहतात, ही अभिनंदनीय बाब होय.
- गीता वंजारी, मुख्याधिकारी