वरूड पालिकेत अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST2021-04-07T04:12:44+5:302021-04-07T04:12:44+5:30
वंचित बहुजन आघाडी : मालमत्ता कर वगळता अन्य कर माफ करण्याची मागणी वरूड : कोरोनाकाळात नागरिकांची आर्थिक परिस्थिती डबघाईस ...

वरूड पालिकेत अर्धनग्न आंदोलन
वंचित बहुजन आघाडी : मालमत्ता कर वगळता अन्य कर माफ करण्याची मागणी
वरूड : कोरोनाकाळात नागरिकांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. अशा परिस्थितीत नगर परिषदेने मालमत्ता, पाणीपट्टी कराची वसुली चालविली. यामुळे मालमत्ता कराव्यतिरिक्त अन्य सर्व कर पालिकेने माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने याबाबत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. ती मागणी पूर्ण न झाल्याने सोमवारी दुपारी १२ वाजता नगर परिषदेत अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
कोरोनाकाळात सन २०२० मध्ये संपूर्ण लॉकडाऊन होते. वरूड शहरातील गोरगरिबांच्या हाताला कामधंदा नव्हता. लॉकडाऊन शिथिलतेनंतर कुठे थोडे काम सुरळीत चालू झाले. पुन्हा आता लॉकडाऊन लावण्यात आला. यामुळे कामधंदे, किरकोळ काम, मजुरी मिळत नसल्याने वरूडमधील नागरिक हैराण झाले आहेत. यातच नगर परिषदेने कर मागणी बिले घरोघरी पाठवली आहेत. यामुळे वंचीत बहुजन आघाडी जिल्हा महासचिव सुशील बेले यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. फक्त मालमत्ता कर घेण्यात यावा. पाणीपट्टी कर, दिवाबत्ती कर, वृक्ष कर, साफसफाई कर व इतर कर दहा दिवसांच्या आत माफ करण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. परंतु, नगर परिषदेने कोणतीही दखल घेतली नसल्याने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी सुशील बेले, अशोक गडलिंग, श्रावण शियाले, पुंडलिक देशभ्रतार, जाफरखाँ पठाण, अमर हरले, प्रदीप दुपारे, संदीप बेहरे, नीलेश अधव, गौतम अधव, आशिष लांडगे, गणपत धुर्वे, मोहमद अबरार, रोशन गाठे, अरविंद गाडगे, अनिकेत रामटेके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
---------