आंतरजिल्हा बदलीची दीडशे प्रकरणे मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2016 00:22 IST2016-11-09T00:22:51+5:302016-11-09T00:22:51+5:30
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ मार्गी लावण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाची प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक...

आंतरजिल्हा बदलीची दीडशे प्रकरणे मार्गी लागणार
आश्वासन : बच्चू कडूंच्या मध्यस्तीने उपोषण सुटले
अमरावती : आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ मार्गी लावण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाची प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक तथा आ. बच्चू कडू यांच्या मध्यस्तीने सोमवारी उपोषणाची सांगता करण्यात आली. येत्या डिसेंबरअखेर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या दीडशे पदांवर पदस्थापना देण्यात येतील, असे लेखी आश्वासन उपायुक्त राजाराम झेंडे यांच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी प्रहार शिक्षक संघटनेला दिले.
आंतरजिल्हा बदली प्रश्नावर मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे आंतरजिल्हा बदलीने दीडशे शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे अखेर शिक्षण विभागाने लेखी स्वरूपात मान्य केले. प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात आंतरजिल्हा बदलीच्या मागणीकरिता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
या आंदोलनाची दखल घेत आ.कडू यांनी शिक्षकांच्या मागणीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डिसेंबरअखेर जिल्ह्यातील रिक्त दीडशे पदांवर पदस्थापना देण्यात येणार असल्याचे चर्चेत स्पष्ट झाल्याने आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार बच्चू कडूंसोबत प्रहार जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर, दीपक धोटेंसह प्रहारचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)