तालुक्यातील ९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना गारपिटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST2021-03-28T04:12:27+5:302021-03-28T04:12:27+5:30
५७ गावांतील पिके बाधित, सर्वाधिक फटका संत्रा पिकाला, महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालातील अंदाज चांदूरबाजार : तालुक्यात २० मार्चला ...

तालुक्यातील ९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना गारपिटीचा फटका
५७ गावांतील पिके बाधित, सर्वाधिक फटका संत्रा पिकाला, महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालातील अंदाज
चांदूरबाजार : तालुक्यात २० मार्चला वादळी पावसासह गारपीट झाली. ही गारपीट सात महसुली मंडळांपैकी तीन मंडळात झालेली आहे. यात शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी, करजगाव या तीन मंडळांचा समावेश आहे. इतर पाच मंडळांत फक्त पाऊस झाल्याची नोंद आहे. या तीन मंडळांत मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केलेल्या पाहणीप्रमाणे तालुक्यातील ९ हजार ५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना गारपिटीचा फटका बसल्याचा अंदाज महसूल विभागाने प्राथमिक अहवालात नोंदविला आहे.
प्राथमिक अहवालानुसार करजगाव, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा मंडळातील ५७ गावांतील रबी पिके व फळ पिके गारपिटीने बाधित झाल्याचा अंदाज आहे. यात सर्वाधिक फटका संत्रा फळपिकांना बसला आहे. तसेच गहू, कांदा व इतर पिकांचेही या गारपिटीत नुकसान झाले आहे. २० मार्च रोजी झालेल्या गारपिटीत समाविष्ट असलेल्या ५७ गावांमधील सर्वाधिक २६ गावे ब्राम्हणवाडा थडी महसूल मंडळात आहेत. त्यानंतर १७ गावे करजगाव मंडळात आण १४ गावे शिरजगाव कसबा मंडळातील आहेत.
प्राथमिक अहवालात गारपिटीने नुकसान झालेल्या ९ हजार ५४ हेक्टर क्षेत्रात, ६ हजार ४७३ हेक्टर क्षेत्र संत्रा, १ हजार ४१० हेक्टर क्षेत्रावरील गहू पीक, ७२० हेक्टर क्षेत्रावरील कांदा पीक, ४५१ हेक्टर क्षेत्रावरील इतर पिकांचा समावेश आहे. इतर पिकांमध्ये भाजीपाला, कांदा बीजोत्पादन व संत्रा वगळता इतर फळ पिकांचा समावेश आहे. गारपिटीने पिकांचे सर्वाधिक नुकसान, शिरजगाव कसबा मंडळात झाले आहे. या मंडळात १४ गावांतील अंदाजे ४ हजार २४० हेक्टर क्षेत्रावरील पिके गारपिटीने नुकसानग्रस्त झाली आहेत. यात २ हजार ९०० हेक्टर संत्रा, ६६३ हेक्टर गहू, ३७३ हेक्टर कांदा, २९४ हेक्टर इतर पिके गारपिटीने प्रभावित झाली आहेत.
प्रत्यक्ष पंचनाम्याची प्रतीक्षा
ब्राम्हणवाडा थडी मंडळातील २६ गावांमधील अंदाजे २ हजार ८९६ क्षेत्राला गारपिटीचा फटका बसला आहे. यात एक हजार ९८२ हेक्टर संत्रा, ४७३ हेक्टर गहू, ३४७ हेक्टर कांदा, ९४ हेक्टर इतर पिके, या पिकांचा समावेश आहे. करजगाव मंडळातील १७ गांवांमध्ये, एक हजार ९२८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना गारपिटीचा फटका बसला आहे. यात एक हजार ५९१ हेक्टर संत्रा, २७४ गहू व ६३ हेक्टर इतर पिकांचा समावेश आहे. प्रत्यक्ष पिकनिहाय पंचनामे करताना प्राथमिक अहवालातील, एकूण क्षेत्रात व पीकनिहाय क्षेत्रात वाढ किंवा घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट
२० मार्च रोजी तालुक्यात झालेल्या गारपिटीचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. त्यानुसार आदेश प्राप्त होताच पंचनामे करून पीकनिहाय झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज घेण्यात येईल. त्यानंतर अंतिम अहवाल तयार करून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीच्या निधीची मागणी शासनाकडे पाठविण्यात येईल.
- धीरज स्थुल, तहसीलदार, चांदूरबाजार
------------