वरूड तालुक्यात गारपीट; अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:34 IST2019-02-15T23:34:39+5:302019-02-15T23:34:53+5:30
तालुक्याला शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाचा फटका बसला. सुमारे २० मिनिटे बोराएवढी गारपीट झाल्याने संत्रा, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील कारली, वाई, पेंढोणी, जामगाव, महेंद्री, करवार, पंढरी, पुसला परिसरात अवकाळी पावसासह ही गारपीट झाली.

वरूड तालुक्यात गारपीट; अवकाळी पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तालुक्याला शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाचा फटका बसला. सुमारे २० मिनिटे बोराएवढी गारपीट झाल्याने संत्रा, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील कारली, वाई, पेंढोणी, जामगाव, महेंद्री, करवार, पंढरी, पुसला परिसरात अवकाळी पावसासह ही गारपीट झाली.
पुसला, शेंदूरजनाघाट परिसरात १५ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानकच ढग दाटले. अवकाळी पावसासह गारपीट सुरू झाली. तब्बल २० मिनिटे गार कोसळली. यामुळे संत्र्यावर फुललेला आंबिया बहर जमिनीवर येऊन मातीमोल झाला. गहू व हरभरा पिकालासुद्धा फटका बसला. तालुक्यात काही ठिकाणी मृग बहराच्या संत्र्याची तोड सुरू आहे. त्या संत्र्यावरसुद्धा गारपिटीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. गारपिटीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे.
भाजपचे माजी उपाध्यक्ष विजय श्रीराव यांनी तातडीने पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून भरपाईची मागणी प्रशासनाला केली आहे. महिनाभरापूर्वी तालुक्यात झालेल्या गारपिटीने संत्रा व गव्हाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानाचे सर्वेक्षण अद्यापही झालेले नसताना, शुक्रवारी पुन्हा एकदा निसर्ग कोपला अन् हाता-तोंडाशी आलेला संत्र्यांचा आंबिया बहर मातीमोल झाल्याने बागायतदार हवालदिल झाला आहे. तालुक्यात अन्य ठिकाणी गारपीट होण्याची धास्ती शेतकºयांना आहे.