तत्कालीन कुलगुरूंच्या कारभाराविरोधात जिल्हा कचेरीपुढे हाेमहवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:11+5:302021-06-03T04:10:11+5:30
संत गाडगेबाबा संघर्ष समितीचे आंदोलन, गरजूंना धान्य व कपडे वाटप अमरावती : तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना भ्रष्टाचाराची कबुली ...

तत्कालीन कुलगुरूंच्या कारभाराविरोधात जिल्हा कचेरीपुढे हाेमहवन
संत गाडगेबाबा संघर्ष समितीचे आंदोलन, गरजूंना धान्य व कपडे वाटप
अमरावती : तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना भ्रष्टाचाराची कबुली देण्याचे बळ व सद्बुद्धी संत गाडगेबाबांनी द्यावी, यासाठी बुधवारी जिल्हा कचेरीपुढे होमहवन करण्यात आले. चांदेकर यांच्यामुळे लागलेल्या ग्रहणातून मुक्त झाल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले. त्याचबरोबर गरजूंना धान्य व कपडे वाटप करण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीने हे अभिनव आंदोलन केले.
गेल्या पाच वर्षांपासून तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून सामान्य विद्यार्थ्यांची फसवणूक केली. विद्यापीठात जमा होणारा सामान्य विद्यार्थ्यांचा पैसा अपात्र कंपन्याच्या घशात ओतून आर्थिक नुकसान केले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, ट्रेनिंग प्लेसमेंट, विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या, विकास आदी बाबींना नख लावण्याचे काम चांदेकर यांनी केले, असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. या सर्व बाबींची चीड विद्यार्थी वर्गामध्ये आहे. विद्यार्थी विरोधी व भ्रष्ट मुरलीधर चांदेकर यांच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये असलेला संताप अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रतिकात्मकरीत्या होमहवनाद्वारे व विद्यापीठाच्या विविध विभागांत गोमूत्र शिंपडून व्यक्त केला. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, प्रथमेश पिंपळे, अजिंक्य मेटकर, अखिल ठाकरे, तुषार कोंबे, भूषण कोलपकर, गोविंद यादव, अमन सोनी आदी विद्यार्थी उपस्थित होते.
---------------------
(स्वतंत्र बातमी घेणे)
विद्यापीठात गोमूत्र शिंपडले, १० जणांविरुद्ध गुन्हे
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गाेमूत्र शिंपडल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी केली.
पोलीस सूत्रानुसार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बुधवारी तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या कारभाराचा विरोध करण्यासाठी सामूहिक हाेमहवन केले. यादरम्यान काही गरजूंना धान्य व कपडे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आंदोलकांनी विद्यापीठाकडे धाव घेतली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास परीक्षा विभागात आंदोलकांनी सोबत आणलेले गोमूत्र शिंपडले. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना गर्दी केल्याने व महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिनेश सूर्यवंशी तसेच १० जणांविरुद्ध भांदविच्या १४३, २६९, ५१(ब), १८८, १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस विद्यापीठात पोहोचताच आंदोलकांनी पळ काढला. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाने पोलिसांत फिर्याद दिली.
------------
कोट
विद्यापीठात गोमूत्र शिंपडल्याप्रकरणी पोलिसांनी स्वत: पुढाकार घेत १० ते १५ जणांवर गुन्हे नोंदविले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आंदोलकांनी केले. त्यांची ओळख पटविली जात आहे.
- पुंडलिक मेश्राम, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा.