गुंफाबाई मेश्राम बसपच्या गटनेता
By Admin | Updated: February 27, 2015 00:20 IST2015-02-27T00:20:10+5:302015-02-27T00:20:10+5:30
महापालिकेत बहुजन समाज पार्टीच्या गटनेतापदी गुंफाबाई मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अजय गोंडाणे यांना गटनेता...

गुंफाबाई मेश्राम बसपच्या गटनेता
अमरावती : महापालिकेत बहुजन समाज पार्टीच्या गटनेतापदी गुंफाबाई मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अजय गोंडाणे यांना गटनेता पदावरुन पायउतार करीत सहा आठवडे ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवली आहे. परिणामी दीड वर्षांपासून बसपमध्ये सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे.
बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्या आदेशान्वये सन - २०१२ मध्ये पार पडलेल्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सहाही सदस्यांनी तटस्थ अशी भूमिका बजावावी, असा पक्षादेश होता. मात्र अजय गोंडाणे, दीपमाला मोहोड या दोन सदस्यांनी निवडणुकीत मतदान करुन पक्षादेश झुगारला होता. त्यामुळे पक्षाने या दोन्ही सदस्यांवर कारवाई करीत गोंडाणे यांच्या जागी गटनेतापदी गुंफाबाई मेश्राम यांची वर्णी लावली होती. त्याअनुषंगाने पक्षाने विभागीय आयुक्तांना पत्रसुद्धा दिले होते. परंतु या निर्णयाविरुद्ध अजय गोंडाणे हे उच्च न्यायालयात गेलेत. याचिका क्रमांक २६१६/२०१४ चा निर्णय देताना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अजय गोंडाणे यांचे गटनेतापद खारीज करुन पक्षाचे महासचिव माने यांनी ठरविल्यानुसार गुंफाबाई मेश्राम यांची निवड केली आहे. मात्र सहा आठवड्याचा कालावधी बसपत ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निकालाने गुंफाबाई मेश्राम, दीपक पाटील, निर्मला बोरकर व अल्का सरदार या चार सदस्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता सहा आठवडे अजय गोंडाणे हेच कामकाज पाहतील. (प्रतिनिधी)