सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

By Admin | Updated: May 16, 2016 00:10 IST2016-05-16T00:10:08+5:302016-05-16T00:10:08+5:30

कार्यक्षम सिंचन व्यवथापनासाठी देखभाल दुरुस्तीची कामे नियमितपणे वेळेत होणे गरजेचे आहे.

Guidelines for the repair of irrigation projects | सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

कार्यक्षमता वाढवा : विहीत वेळेत कामे होण्यासाठी शासनाचे आदेश
अमरावती : कार्यक्षम सिंचन व्यवथापनासाठी देखभाल दुरुस्तीची कामे नियमितपणे वेळेत होणे गरजेचे आहे. अनुदानाच्या प्रमाणात कामाचे प्राधान्य निश्चित करण्याची जबाबदारी मुख्य अभियंत्यावर सोपविली आहे. मात्र या प्रक्रियेत मान्यता घेण्यात वेळ जात असल्याने निविदा प्रक्रिया व कामे त्या वर्षात पूर्ण होत असल्याची बाब समोर आल्याने शासनाने सिंचन प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत.
या मार्गदर्शक सूचनांनुसार दरवर्षी प्रचलित मापदंडानुसार अनुज्ञेय होणाऱ्या अनुदानामध्ये हाती घ्यावयाच्या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची प्राप्त सूची व प्राधान्यक्रम निश्चिती व अंमलबजावणीची जबाबदारी अधीक्षक अभियंत्यांची राहणार आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये पाणी साठवणुकीसाठी वेळेवर दरवाजे बसविणे व काढणे यासाठी देखभाल दुरूस्तीची कामे त्यानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्याची राहणार आहे.
मंजूरप्राप्त सूची व प्राधान्यानुसारच अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेमध्ये निविदा मंजुरी व कार्यारंभ आरंभ दिले जातील. याबाबत संनियत्रण करण्याची जबाबदारी अधीक्षक अभियंता स्तरावर राहणार आहे.
प्रतिवर्षी प्रत्येक प्रकल्पावर अनुज्ञेय अनुदानाच्या प्रमाणात विहित केलेल्या प्राधान्यानुसार अधीक्षक अभियंता स्तरावर केल्या जाणाऱ्या कार्यवाहीवर वेळोवेळी आढावा घेऊन नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मुख्य अभियंत्या यांचेवर राहणार आहे.
देखभाल दुरुस्ती कामांसाठी प्रतिवर्षी मंजूर केलेल्या निविदांमधील कामे पूर्ण करून त्यांची देयके त्या वर्षीच्या उपलब्ध अनुदानात अदा होतील, असे नियोजन करण्याची जबाबदारी अधीक्षक अभियंता स्तरावर राहिले त्या दृष्टीने निविदेचा कार्य कालावधी ठरवावा लागणार आहे. धरण सुरक्षेची कामे, जलसेतू, सायफन व मोठ्या बांधकामाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी जास्त कालावधी लागत असल्यास तसा निर्णय सक्षम स्तरावर घेण्यात यावा. देखभाल दुरुस्तीच्या निविदा कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पुढील मार्च अखेर आपोआप रद्द होतील, अशी अट निविदामध्ये अंतर्भूत करावी, असे निर्देश आहे. (प्रतिनिधी)

दुरुस्तीची कामे वगळता
इतर निविदा होणार रद्द
अनेक प्रकल्पावर देखभाल दुरुस्तीच्या कामात दोन वर्षांपूर्वीच्या अनेक निविदा चालू आहेत. दरवर्षी उपलब्ध निधीपैकी मोठा हिस्सा जुन्या निविदांच्या प्रलंबित देयकासाठी वापरला जातो. त्यामुळे सिंचन व्यवस्थापनात सध्या दैनंदिन येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या कामांसाठी निधी दिल्या जात नसल्याने सिंचनातील अडचणी वाढत आहेत व लाभधारकांच्या तक्रारी निर्माण होत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी धरण सुरक्षितता कामे, कालव्यावरील जलसेतू, विमोचन आदी अत्यावश्यक दुरुस्तीची कामे वगळता इतर निविदा रद्द करण्याचे निर्देश आहेत.

तर वैयक्तिक
जबाबदार धरणार
सिंचन प्रकल्पास मापदंडानुसार अनुज्ञेय होणाऱ्या अनुदानाच्या मर्यादेतच दरवर्षी देखभाल दुरुस्तीच्या निविदा मंजूर कराव्यात. अनुज्ञेय अनुदानापेक्षा जास्त रकमेच्या निविदा मंजुरी करणे व कामाचे आदेश दिल्यास ती आर्थिक अनियमितता समजण्यात येईल, याबाबत कार्यकारी अभियंता व विभागीय लेखापाल यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

असे आहेत कामांचे प्राधान्यक्रम
दरवर्षी अनुदेय अनुदानाच्या प्रमाणात हाती घेण्याच प्राधान्यक्रम शासनाने जारी केले आहे. यामध्ये धरण सुरक्षितता संघटनेच्या अहवालातील त्रुटींची दुरुस्तीची कामे याला प्रथम प्राधान्य आहे. यानंतर पाणी वापर संस्थांना हस्तांतरीत करावयाच्या लाभ क्षेत्रातील वितरण व्यवस्थेची दुरुस्ती तसेच हंगामातील प्रत्यक्ष सिंचित करावयाच्या क्षेत्रासाठी कालवा दुरुस्तीची कामे यांना प्राधान्य राहणार आहे.

Web Title: Guidelines for the repair of irrigation projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.