मध्यवर्ती कारागृहात मार्गदर्शन कार्यक्रम
By Admin | Updated: September 16, 2015 00:17 IST2015-09-16T00:17:06+5:302015-09-16T00:17:06+5:30
जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अमरावती व जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंद्यींना रविवारी कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले.

मध्यवर्ती कारागृहात मार्गदर्शन कार्यक्रम
अमरावती : जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अमरावती व जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंद्यींना रविवारी कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती दास होते. न्या. वर्मा, न्या. अग्रवाल, न्या.ओझा, न्या.वानखेडे, कारागृह अधीक्षक एस.व्ही. खटावकर, उपअधीक्षक ढोले व वरिष्ठ तुरूंगाधिकारी क्षीरसागर उपस्थित होते.
या कार्यक्रमात दास यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. वर्मा यांनी साधारण गुन्हे व त्यावरील शिक्षा याविषयी मार्गदर्शन केले. अग्रवाल यांनी वाटाघाटी न्यायप्रक्रियेवर मार्गदर्शन केले. ओझा यांनी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उद्देश स्पष्ट केला. वानखेडे यांनी जामीन कशी मिळते यावर मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक खटावकर यांनी संचित व अभिवचन रजा यावर मार्गदर्शन केले.
कारागृहाचा मुख्य उद्देश सुधारणा आणि पुनर्वसन हा असून या उद्देशानेच कारागृहात बंद्यांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचे मुख्य कारण म्हणजे कारागृहातून बंदी सुटल्यानंतर त्याच्या मनात अपराधी भावना न राहता तो समाजात मिसळून त्यासाठी त्याला असे प्रशिक्षण दिले जाते. यालाच अनुसरून येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांच्यामार्फत ६ महिन्यांचे वायरमन प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये २३ बंद्यांनी सहभाग घेतला होता. त्याची परीक्षा फेब्रुवारीत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्व बंदी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या प्रमाणपत्रांचे वितरण न्यायमूर्ती दास यांच्या हस्ते करण्यात आले. दास यांनी बंद्यांना पुढील जीवनाकरिता शुभेच्छासह प्रमाणपत्रांचे वितरण केले. सूत्रसंचालन बी.एम. कांबळे यांनी, तर आभार प्रदर्शन कारागृह उपअधीक्षक बी.एन. ढोले यांनी केले. (प्रतिनिधी)