गुडेवारच ‘अमृत’चे कर्तेकरविते
By Admin | Updated: December 31, 2016 01:26 IST2016-12-31T01:26:34+5:302016-12-31T01:26:34+5:30
निविदा प्रक्रिया न राबविता आणि किमान वेतन कायद्याला हरताळ फासत सुरक्षा रक्षकाचा कंत्राट ‘अमृत’ला देण्यात आला.

गुडेवारच ‘अमृत’चे कर्तेकरविते
सुनील देशमुखांचा आरोप : महापालिकेत आढावा बैठक
अमरावती : निविदा प्रक्रिया न राबविता आणि किमान वेतन कायद्याला हरताळ फासत सुरक्षा रक्षकाचा कंत्राट ‘अमृत’ला देण्यात आला. यात विद्यमान यंत्रणा दोषी नसून या प्रशासकीय अनियमिततेचे गुडेवारच कर्तेकरविते असल्याचा आरोप आ. सुनील देशमुख यांनी शुक्रवारी केला.
आ.सुनील देशमुख यांनी शुक्रवारी दुपारी महापालिका सभागृहात नगरोत्थान योजनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेचा दाखला देत आयुक्तांकडून ‘अमृत’बद्दल जाणून घेतले. मे २०१६ मध्ये अमृत या संस्थेशी करारनामा करताना काही गोष्टी चुकल्यात, असे आयुक्त हेमंत पवार यांनी स्पष्ट केले. जगदंबा ही संस्था ‘ब्लॅकलिस्ट’ केल्यानंतर सुरक्षा रक्षकांमधीलच काहींना एकत्र आणून गुडेवारांच्या पुढाकाराने ‘अमृत’ची स्थापना करण्यात आली, असे आयुक्तांनी सांगताच देशमुख कमालीचे संतापले. त्यांचा तोल ढळला. आणि त्यांनी आरोपांच्या फैरी झाडणे सुरू केले. तथापि अमृतच्या मुळ मुद्द्याला निर्णायक वळण मिळाले नाही.
-तर गुडेवारांची पूजा करा!
गुडेवारांनी शहराचा सत्यानाश केला. मात्र जसे मोदीभक्त आहेत. तसेच काही गुडेवारभक्त सुद्धा असल्याची टीका सुनील देशमुखांनी केली. गुडेवारांचे फोटो घरी लावा, त्यांची पुजा करा, मात्र ‘सिलेक्टेड’ होऊ नका, असा सल्ला देशमुखांनी दिला. पीएम आवास योजनेचा त्यांनी कसा बट्ट्याबोळ केला, हे आपण पाहतच आहोत, अशी टिप्पणी करुन देशमुखांनी गुडेवारांप्रतीची भावना व्यक्त केली.