सालबर्डीत शिवभक्तांची मांदियाळी
By Admin | Updated: February 15, 2015 00:09 IST2015-02-15T00:09:14+5:302015-02-15T00:09:14+5:30
मध्य प्रदेश शासनाच्या नियंत्रणात असलेले ‘शिवलिंग’ आणि महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणात असलेली ‘सालबर्डी यात्रा’ ही दोन्ही राज्याच्या शिवभक्तांना ...

सालबर्डीत शिवभक्तांची मांदियाळी
लोकमत विशेष
चांदूरबाजार : मध्य प्रदेश शासनाच्या नियंत्रणात असलेले ‘शिवलिंग’ आणि महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणात असलेली ‘सालबर्डी यात्रा’ ही दोन्ही राज्याच्या शिवभक्तांना जोडणारी सातपुड्याच्या निसर्गरम्य परीघ आपले वेगळे अस्तित्व राखून आहे. याच ठिकाणी महानुभावाचे दैवत चक्रधर स्वामी यांनी धारण केलेले मौनव्रत व ८८ वर्षांपूर्वी राष्ट्रसंतांनी या ठिकाणी केलेला महायज्ञ, या घटनांची सालबर्डी यात्रा साक्षीदार आहे.
पांडवांच्या अज्ञातवासाचा साक्षीदार असलेल्या या ठिकाणाला सुमारे ७०० वर्षांची परंपरा आहे. दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत लाखो शिवभक्त हजेरी लावतात. मध्यप्रदेश शासनाच्या हद्दीत सातपुड्याच्या नैसर्गिक कुशीत ६५० फूट उंचीवर विशाल दगडातून प्राचीन शिवगुफेतील शिवलिंगावर अखंड पाण्याचा अभिषेक सुरू आहे. देशात बारा ज्योतिर्लिंग ज्याप्रमाणे प्रसिध्द आहेत. त्यापैकी सालबर्डीला लहान महादेव म्हणून स्थान आहे. ज्या शिवभक्तांना पचमढीच्या मोठ्या महादेवाला जाणे शक्य होत नाही ते सालबर्डीला भेट देतात. महादेवाचे दर्शन घेण्याकरिता शिवभक्तांना तीन कि.मी. उंचावर पायी चालून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागते. येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. माळू नदीच्या काठावर थंड-गरम पाण्याचे झरे असून हे ठिकाण ‘सीतेची न्हाणी’ म्हणून प्रसिध्द आहे. या पाण्याने चर्मरोग असणाऱ्याने नियमित आंघोळ केल्यास चर्मरोग कायमचा नाहीसा होतो, अशी श्रद्धा आहे.
याशिवाय पुरुषोत्तम श्रीरामाच्या अश्वमेघ यज्ञातील श्यामवर्ण घोड्याच्या टाचा समान खुणा आजही सालबर्डीच्या पर्वतरांगात ठिकठिकाणी आढळून येतात.
याच पर्वतरांगात पुरातन अशी पांडव कचेरी आहे. दगडी फरशाव्दारे कोरीव काम केलेले मोठे सभागृह आहे. ही पांडव कचेरी हेमाडपंथी मंदिराच्या आकाराची आहे.
सभोवताल परकोट बांधला असून भग्नावस्थेत आहे. पहिली पायरी चढल्यांनर थोड्या अंतरावर माडू नदी व गंगानदीचा संगम असून या दोन्ही नदांच्या काठावर पूर्वेस राममंदिर तर पश्चिमेस चक्रधर स्वामींचे मोठे मंदिर आहे.
चक्रधर स्वामींनी या ठिकाणी मौनव्रत धारण करुन तपस्या केली होती. पंचकृष्णांपैकी त्यांना पाचवे कृष्ण समजले जाते. महानुभावांची याठिकाणी वर्षभर वर्दळ राहते. येथील कृष्णाची मूर्ती अप्रतिम आहे. याच पर्वतात सासारक्षण संस्थान आहे. सन १९२५ दरम्यान याठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘महायज्ञ’ केला होता. आज येथे राष्ट्रसंतांचे प्रशस्त मंदिर आहे. याठिकाणी शिवरात्रीच्या पर्वावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. शिवगुफेत जाताना हनुमानाची कोरीव मूर्ती आहे. शिवभक्तांना पायऱ्या चढत शिवगुफेपर्यंत जावे लागते.
येथून विशाल पहाडातून पाण्याचे झिरपणे सुरु झाल्याचे दिसते. येथे पोहोचण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी जादा बसेत सोडण्यात येतात. महाशिवरात्रीनिमित्त सालबर्डीत भक्तांची प्रचंड गर्दी दिसून येऊ लागली आहे. प्रशासनही सुसज्ज आहे. (तालुका प्रतिनिधी)