पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती
By Admin | Updated: March 1, 2016 00:10 IST2016-03-01T00:10:23+5:302016-03-01T00:10:23+5:30
रविवारी झालेल्या गारपीटग्रस्त परिसराची पाहणी करण्याकरिता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दौरा केला.

पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती
बाजार समितीची पाहणी : व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करा
चांदूरबाजार : रविवारी झालेल्या गारपीटग्रस्त परिसराची पाहणी करण्याकरिता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दौरा केला. पहली भेट त्यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली. याप्रसंगी बाजार समितीमधील शेतकऱ्यांचा शेतमालाची गारपीट व वादळी पावसाने झालेली वाताहात पाहून पालकमंत्र्याचा राग अनावर झाला. त्यांनी हर्रासाच्या ठिकाणीच बाजार समितीचा गलथान कारभार बघून सचिवांची झाडाझडती घेतली.
बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या ८००० पोती विक्रीकरिता होती. यात गहू, तूर, हरभरा, सोयाबीन, आदी मालाचा समावेश होता. अचानक आलेल्या गारपीट व वादळी पावसामुळे यातील ६००० पोत्यांची नासाडी झाल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आले. शेतकऱ्यांचा कोट्यवधींचा माल पावसात भिजल्याने ते माल व्यापारीही खरेदी करण्यास तयार होत नाही.
यावेळी बाजार समितीही शेतकऱ्यांचा पाठीशी राहत नसल्याचे निदर्शनास आले. जे व्यापारी ओला माल खरेदी करणार नाही त्याचे परवाने त्वरित रद्द करण्याचे आदेश पालकमंत्री पोटे यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांचा विक्रीस आलेल्या मालाला पावसापासून पूर्ण संरक्षण मिळेल, अशी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे आदेश बाजार समिती सचिव मनीष भारंबे यांना दिले. ही व्यवस्था न झाल्यास कार्यवाहीस तयार रहा, अशी पालकमंत्र्यांनी तंबीही दिली.
यानंतर पालकमंत्री जसापूर मार्गावरील श्रीराम भेले, आशिष कोरडे, बंड यांच्या शेतात पाहणी केली. त्यानंतर जसापूर मार्गे कोदोरी, दिलालपुर, माघाण, काजळी, देऊरवाडा, शिरजगाव कसबा या गावातील शेताची पाहणी करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यात. यावेळी प्रशांत चर्जन या शेतकऱ्यांने आपल्या शेतातील कांदा या पिकाचे नुकसानग्रस्त रोपटे पालकमंत्री यांना पाहणीकरीता आणले होते. याप्रसंगी पालकमंत्री पोटे, आ. बच्चू कडू, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी राठोड, तहसीलदार शिल्पा बोबडे, तालुका कृषी अधिकारी राजीव मेश्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर सुने, दिनेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष अशोक बनसोड, शहर अध्यक्ष किशोर मेटे, कोरडे, बाळासाहेब सोनार उपस्थित होते.
आमदारांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
आमदार बच्चू कडू यांनी गारपीट झाल्यानंतर ताबडतोब स्वत: बेलोरा, नानोरी, सोनोरी, बोरज, जसापुर, माधान, दिलालपुर, कारंजा बहिरम, शिरजगांव कसबा आदि गावांना भेटी देवून शेतकऱ्यांचा व्यथा जाणून घेतल्या. तसेच जिल्हाधिकारीशी संपर्क साधून शेतकऱ्यांना तत्काल मदतीची मागणी केली. तालुक्यातील सर्वच गारपीट ग्रस्त गावांचा दौरा करुन शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहे.