पालकमंत्र्यांचा जुगार अड्ड्यावर छापा

By Admin | Updated: October 13, 2016 05:26 IST2016-10-13T05:26:31+5:302016-10-13T05:26:31+5:30

शहरात सर्रास जुगाराचे अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्वत: एका मटक्याच्या अड्ड्यावर धाड

Guardian Minister's gambling raid | पालकमंत्र्यांचा जुगार अड्ड्यावर छापा

पालकमंत्र्यांचा जुगार अड्ड्यावर छापा

अमरावती : शहरात सर्रास जुगाराचे अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्वत: एका मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकून चार आरोपींना पाठलाग करून पकडले. कोणताही सरकारी लवाजमा सोबत न घेता, त्यांनी केलेल्या या कारवाईची जिल्ह्यात खमंग चर्चा सुरू आहे. याची छायाचित्रे तरुणांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर दिवसभर फिरत होती. फेसबुकवर त्याची बरीच चर्चा झाली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम, खनिकर्म, उद्योग आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे हे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडे अनेक सामान्य नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्या आधारे मंगळवारी सायंकाळी त्यांनी स्वत: रवी गुप्ता याच्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. दस्तुरखुद्द पालकमंत्री आल्याचे लक्षात येताच जुगार खेळणारे घाबरले. जागा मिळेल तिकडे पळू लागले, परंतु पालकमंत्र्यांनी पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. त्यानंतर, संतप्त पालकमंत्र्यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
पोलिसांनी प्रभाकर आकाराम शिरभाते (५१, आदर्शनगर), गजानन बाबाराव शिरभाते (४०,रा. मूर्तिजापूर), बाबू नागोराव सुरकार (३७,रा. विलासनगर) आणि आशिष शंकर निमजे (२९, रा. नागपूर) या चार आरोपींना अटक केली. जुगार अड्ड्याचा मुख्य सूत्रधार रवी गुप्ता हा पसार होण्यात यशस्वी झाला. त्याच्या अटकेचे आदेश पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सट्टापट्टी, जुगाराचे अन्य साहित्य व ८,७८० रुपये रोख असा एकूण ११,२८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Guardian Minister's gambling raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.