पालकमंत्र्यांनी देशमुखांचे मार्गदर्शन घ्यावे

By Admin | Updated: April 30, 2016 00:07 IST2016-04-30T00:07:29+5:302016-04-30T00:07:29+5:30

जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी त्यांच्या राठीनगर ते सर्कीट हाऊस या नियमित दौऱ्यात बदल करून ...

Guardian minister should take the guidance of Deshmukh | पालकमंत्र्यांनी देशमुखांचे मार्गदर्शन घ्यावे

पालकमंत्र्यांनी देशमुखांचे मार्गदर्शन घ्यावे

राणांचा पोटेंना सल्ला : एक तरी मोठे विकास काम दाखवा, सत्कार करेन
अमरावती : जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी त्यांच्या राठीनगर ते सर्कीट हाऊस या नियमित दौऱ्यात बदल करून माजी पालकमंत्री तथा आमदार सुनील देशमुख यांच्या ‘आशीर्वाद’ बंगल्याचे स्थळ समाविष्ट करावे, असा सल्ला बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवि राणा यांनी शुक्रवारी दिला.
मुख्यमंत्र्यांच्या शनिवारी आयोजित जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आ. राणांनी पत्रपरिषदेतून हा प्रहार केला.
सरकार दोन वर्षांची वाटचाल करीत आहे. या काळात केलेले एखादे मोठे विकासकाम पालकमंत्र्यांनी दाखवावे. मी त्यांचा जाहीर सत्कार करेन. पाणंद रस्ते अभियान लोकसहभागातून राबविले जात आहे. यात पालकमंत्र्याचे श्रेय नाही. डीपीसीतून त्याकरिता तरतूद केली असती तर पालकमंत्री पाणंद रस्ते योजना म्हणता आले असते. आ. वीरेंद्र जगताप यांनी पालकमंत्र्यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेशी मी सहमत आहे.
बडनेरा मतदारसंघात ना. प्रकाश मेहता यांनी निधी मंजूर केला. त्याकरिता आपण पाठपुरावा केला. मात्र, पालकमंत्री त्याचे श्रेय घेत असल्याचा आरोप राणा यांनी केला.

-तर सोफियाविरुद्ध आंदोलन करू
अमरावती : पालकमंत्र्यांनी मोठ्या कामांमध्ये लक्ष घालावे, असे सांगताना आ.राणांनी, ‘मुंबईहून अमरावतीत येत असताना बडनेरा ते राठीनगर पुढे विश्रामभवन राखीव असा दौरा न ठेवता पालकमंत्र्यांनी आ. सुनील देशमुख यांच्या रूक्मिणीनगर येथील ‘आशीर्वाद’ बंगल्यालादेखील भेट द्यावी. सुनील देशमुखांनीसुध्दा यापूर्वी पालकमंत्रीपद भूषविले आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची दखल घेत पोटेंनी प्रशिक्षण घ्यावे, असा टोमणा राणा यांनी मारला. जिल्ह्यात जी काही विकासकामे गतिशील आहेत, त्यात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचा सिंहाचा वाटा आहे. विकासकामांचे श्रेय पालकमंत्र्यांनी श्रेय घेऊ नये, असे राणा म्हणाले.
मद्यनिर्मिती कारखान्यांना पाणीवाटप बंद करण्यात आले आहे. हाच प्रयोग जिल्ह्यातील सोफिया औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत लागू करावा. कारण सध्या महानगरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.
दोन महिने वीजनिर्मिती प्रकल्प बंद ठेवल्यास फारसे बिघडत नाही. नागरिकांना वेळेत पिण्यासाठी पाणी मिळणे अपेक्षित आहे. पाणीसंकट टाळण्यासाठी रतन इंडिया (सोफिया) ला पाणी देणे बंद करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा, असा इशारा आ. रवि राणा यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा
शहरात रस्ते निर्मितीसाठी राज्य शासनाकडून ९ कोटी रुपये मंजूर करुन आणले आहेत. सिमेंट-क्राँक्रिटीकरणयुक्त रस्ते निर्माण करणारी एजन्सी सार्वजनिक बांधकाम विभाग ही राहणार आहे. मात्र, महापालिकेने रस्ते निर्मितीसाठी नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले नाही. स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी त्याकरिता पुढाकार घेतल्याचा आरोप आ.राणांनी केला. टक्केवारीसाठी एनओसी दिली जात नाही. चांगल्या दर्जाचे रस्ते निर्माण करण्यात बांधकाम विभागाचा हातखंडा आहे. महापालिकेत बीओटी तत्त्वावर जागा विकण्याचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरु असून येथे भ्रष्टाचार बळावल्याचे आ.राणा म्हणाले.

दुष्काळग्रस्तांसाठी राज्यभरातून यावी मदत
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत म्हणून मी एक महिन्याचे मानधन देण्याचे जाहीर केले आहे. हा मदतीचा पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबवावा, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन द्यावे, असे आ. राणा म्हणाले. जिल्ह्यात या उपक्रमाने आघाडी घ्यावी जेणेकरुन अमरावती राज्यात ‘मॉडेल’ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहरभर अवैध धंदे, पोलीस आयुक्त अकार्यक्षम
अवैध धंदे रोखण्यात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक अकार्यक्षम ठरले आहेत. बडनेरा, भातकुली व अमरावतीच्या गल्लीबोळात अवैध दारू विक्री, जुगार, मटक्याला ऊत आला आहे. पोलिसांना मारहाण केली जात असताना कारवाई केली जात नाही, असे पोलीस आयुक्त जनतेचे काय संरक्षण करणार, असा सवाल राणांनी उपस्थित केला. अवैध धंद्यांसाठी पुरस्कार द्यायचा झाल्यास अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनाच पहिला पुरस्कार द्यावा लागेल, असा टोला राणा यांनी लगावला.

मुख्यमंत्री
भीमटेकडीवर येतीलच
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट जाती, धर्माचे नव्हते. बाबासाहेंबाच्या कार्याची दखल देशानेच नव्हे तर विश्वाने घेतली. येथील भीमटेकडीवर साकारण्यात आलेल्या आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारण बाजुला सारून येतीलच. दिलेला शब्द ते पाळतील, असा ठाम विश्वास राणा यांनी यावेळी व्यक्त केला. पुतळ्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानगींची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती राणांनी दिली. पालकमंत्री पोटे यांनीही भीमटेकडीवर येवून बाबासाहेबांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण करावी असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Guardian minister should take the guidance of Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.