पालकमंत्री पांदण रस्त्याचा अमरावती पॅटर्न देशासाठी 'रोल मॉडेल'
By Admin | Updated: June 29, 2016 00:16 IST2016-06-29T00:16:56+5:302016-06-29T00:16:56+5:30
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी लोकसहभागातून जिल्ह्यात यशस्वी करून दाखविलेल्या पालकमंत्री पांदण रस्ते विकास योजनेचा अमरावती पॅटर्न संपूर्ण देशासाठी 'रोल मॉडेल' ठरावा...

पालकमंत्री पांदण रस्त्याचा अमरावती पॅटर्न देशासाठी 'रोल मॉडेल'
पीयूष गोयल : दाभा येथील पांदण रस्त्यांची पाहणी
अमरावती : जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी लोकसहभागातून जिल्ह्यात यशस्वी करून दाखविलेल्या पालकमंत्री पांदण रस्ते विकास योजनेचा अमरावती पॅटर्न संपूर्ण देशासाठी 'रोल मॉडेल' ठरावा, असा आहे. अन्य राज्यांनीसुद्धा या पांदण रस्ते विकासाचा अमरावती पॅटर्न राबविल्यास शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात सुटतील, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांनी केले.
जिल्ह्याच्या दौऱ्यातील टिमटाळा येथून परत येत असताना त्यांनी दाभा शेतशिवरात जाऊन पालकमंत्री पांदण रस्ते विकास अभियानातून साकारण्यात आलेल्या पांदण रस्त्यांची पहाणी केली. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडून या योजनेबद्दल त्यांनी प्रवासात माहिती घेतली होती.
प्रत्यक्ष शेतात जाऊन पांदण रस्ते पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना दाभा येथील पांदण रस्ते दाखविण्यात आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा या गावातील अतिक्रमित रस्ते पूर्णपणे मुक्त झाले असून संपूर्ण पांदण रस्तेच पालकमंत्री पांदन रस्ते विकास योजनेंतर्गत तयार करण्यात आले आहे. पांदण रस्त्यांची पाहणी करताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या कल्पकतेची प्रशंसा करताना म्हणाले की, लोकसहभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करता येऊ शकते, हे आपण पहिल्यांदाच येथे पाहत आहे. शेतात जाणारे रस्ते हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असून पांदण रस्त्यांचा अमरावती पॅटर्न हा देशासाठी रोल मॉडेल ठरावा, असा आहे. महाराष्ट्रात पालकमंत्री पांदण रस्ते विकास योजना सुरू करण्यात आली. त्याप्रमाणे अन्य राज्यांसाठी हा पॅटर्न अनुकरण करावा असाच आहे, असे गोयल म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधून विविध बांबीवर चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, तलाठी विनोद पिंजरकर, मंडल अधिकारी आशिष नागरे तहलसीलदार वाहुवाघ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.