मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा खडा पहारा

By Admin | Updated: February 23, 2017 00:09 IST2017-02-23T00:09:49+5:302017-02-23T00:09:49+5:30

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान मोजणी प्रक्रियेसाठी विभागीय जिल्हा क्रीडा संकुलात पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे.

Guard of the police station at the counting center | मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा खडा पहारा

मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा खडा पहारा

क्रीडा संकुल परिसरात ३०० पोलीस तैनात : गुन्हेगारावर विशेष लक्ष
अमरावती : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान मोजणी प्रक्रियेसाठी विभागीय जिल्हा क्रीडा संकुलात पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. याकरिता तब्बल ३०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांरी तैनात केले जाणार आहे. मतमोजणीदरम्यान पोलीस गुन्हेगारांच्या हालचालीवर सुध्दा लक्ष केंद्रीत करणार आहे.
विभागीय क्रीडा संकुल परिसरात दोन पोलीस उपायुक्त यांच्या नेत्तृत्वात ३ सहायक पोलीस आयुक्त, ४ पोलीस निरीक्षक, २५० पोलीस कर्मचारी व ५० होमगार्ड सज्ज राहणार आहे. या व्यतिरिक्त रुरल कॉलेज व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात १ एसीपी, २ पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक, १०० पोलीस कर्मचारी व १ एसआरपीएफ कंपनी तैनात राहणार आहे.
चांदणी चौकात तात्तुरती पोलीस चौकी : नागपुरी गेट, खोलापुरी गेट व गाडगेनगर परिसरातील मतदान केंद्र हे संवेदनशिल केंद्र आहेत. या परिसरात मतदान प्रक्रियेवेळी गोंधळ निर्माण होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मत मोजणीनंतर या ठिकाणी काही अप्रिय घटना घडू नये, याकरिता चांदणी चौकात तात्पुरत्या स्वरुपात पोलीस चौकी उभारली जाणार असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)

गुन्हेगार डिटेन करणार
मतदान प्रक्रियेत पोलिसांनी शंभरावर गुन्हेगार डिटेन करून त्यांना ठाण्यात बसविले होते. आता मतमोजणी प्रक्रियेवेळी सुध्दा काही कुख्यात गुन्हेगारांना डिटेन केले जाणार असून त्यांच्यावर पोलीस विशेष लक्ष ठेऊन राहणार आहे.

जय-पराजयानंतर वाद होण्याची शक्यता
मतमोजणीनंतर उमेदवारांच्या जय - पराजयाचे परिणाम घोषीत केले जाईल. त्यानंतर उमेदवारांमध्ये आपसात वाद होण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांचा आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तींच्या उमेदवारांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. पराजय झालेले उमेदवार हे विजयी उमेदवारांशी वाद करू शकतात किंवा विजयी झालेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार पराजय झालेल्या उमेदवारांसोबत वाद घालण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा संबंधित उमेदवारांवर व त्यांच्या समर्थकांवर लक्ष ठेऊन राहणार आहे. तसेच त्यांच्या रहिवाशी परिसरात पोलीस गस्त वाढविणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली.

Web Title: Guard of the police station at the counting center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.