निराधार योजना लागू झाल्यापासून अनुदान वाढेना!
By Admin | Updated: February 8, 2015 23:27 IST2015-02-08T23:27:02+5:302015-02-08T23:27:02+5:30
विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य शासनाद्वारे, निराधार, विधवा, अपंग यांच्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा प्रारंभ झाल्यापासून अनुदानात वाढ झालेली नाही.

निराधार योजना लागू झाल्यापासून अनुदान वाढेना!
अमरावती : विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य शासनाद्वारे, निराधार, विधवा, अपंग यांच्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा प्रारंभ झाल्यापासून अनुदानात वाढ झालेली नाही. सध्याच्या जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईतही लाभार्थींना ६०० रुपये महिना अनुदान मिळत आहे. या अनुदानात शासनाने वाढ करण्याची मागणी लाभार्थींची आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना अशा नावांनी या योजना कार्यरत आहेत.
या योजनांमध्ये केंद्र व राज्य शासनाचाही निधी समाविष्ट असला तरी अनुदानाची रक्कम तोकडीच आहे. हे अनुदान दरमहा न मिळता ३ ते ४ महिन्यांच्या फरकाने मिळते. त्यामुळे तालुका मुख्यालयाच्या स्टेट बँकेत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
जीवनावश्यक वस्तंूची वाढती महागाई लक्षात घेता ६०० रुपयांचे अनुदान अगदी तोकडे आहे. त्यातही निराधार व निरक्षर असणाऱ्या लाभार्थ्याचे अनुदान बँकेतून काढून देण्यासाठी व बँकेच्या स्लिप भरण्यासाठी दलालांची मोठी गर्दी असते.
१० ते ५० रुपयांपर्यंत या लाभार्थीकडून उकळले जातात. त्यामुळे या लाभार्थी योजनांच्या अनुदानाची रक्कम वाढविण्याची मागणी अपंग, निराधार, वृद्ध नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)