धामणगाव तालुक्यात कावीळच्या आजारात वाढ
By Admin | Updated: August 7, 2015 00:27 IST2015-08-07T00:27:58+5:302015-08-07T00:27:58+5:30
ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा उदासीनपणा यामुळे तब्बल वीस गावांत दूषित पाणी पुरवठा होत आहे.

धामणगाव तालुक्यात कावीळच्या आजारात वाढ
२० गावांत दूषित पाणी : ताप, उलट्यांचा प्रादुर्भाव
धामणगाव रेल्वे : ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा उदासीनपणा यामुळे तब्बल वीस गावांत दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे कावीळच्या रूग्णांची संख्यादेखील वाढली आहे.
तालुक्यात गत जून व जुलै महिन्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाण्याचे नमुने तपासण्यात आलेत़ तळेगाव दशासर परिसरातील ३५ नमुन्यांपैकी चार गावांतील बारा पाणी नमुने दूषित आढळले. तर अंजनसिंंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विभागात २७ पैकी सर्वाधिक ८ ठिकाणी पिण्याच्या पाण्यात दोष आढळला. मंगरूळ दस्तगीर परिसरात १६ नमुन्यांपैकी चार पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे दिसून आल तर निंबोली परिसरात ८७ पैकी ५ गावांत पाणी नमुन्यात दोष आढळला़
ग्रामीण भागात ब्लिचिंग पावडर टाकताना कोणत्याही मापदंडाचा उपयोग होत नसल्याने दूषित पाण्याचा पुरवठा सुरू असल्याचे दिसत आहे़ तालुक्यातील ४० गावांत अद्यापही शेणाच्या खतांचे ढिगारे कायम आहेत. ग्रामपंचायतीने वारंवार नोटीस देऊनही संबंधितांनी शेणखत न उचलल्यामुळे हे खताचे ढिगारे ग्रामस्थांच्या जीवावर बेतत आहेत. पाण्याच्या स्त्रोत लिक असल्यामुळे दूषित पाणी पिल्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय नाहीत़ ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहे त्या ठिकाणापासून १५ मीटर अंतरावरील सर्व जागा स्वच्छ असणे गरजेचे आहे़ परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही या सूचनेचे पालन होत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे़
तालुक्यातील २० ते २५ गावांतील ग्रामीण रूग्ण शहरात दररोज येत आहेत़
अशक्तपणा, ताप येणे, पोटाच्या उजव्या भागात दुुखणे, डोळ्यांचा, त्वचेचा रंग पिवळा होणे, मळमळ उलट्या होणे, भूक मंदावणे, अतिसार होणे, पिवळ्या गडद रंगाची लघवी होणे अशा रूग्णांत वाढ झाली आहे़ हे रूग्ण खासगी दवाखान्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय रूग्णालयात रूग्णांची गर्दी वाढली आहे़
दूषित पाणी पिल्यामुळे या रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले़ यकृतावार सूज आल्यामुळे कावीळची लागण होत असल्याची प्राथमिक माहिती या डॉक्टरांनी दिली़ जीवावर बेतणाऱ्या या आजारापासून सुटका करून घेण्यासाठी सर्वाधिक सोपा उपाय म्हणजे स्वच्छ व निर्जंतुक पाणी पिणे हा आहे़ ग्रामपंचायतीने स्वच्छ पाणी ठेवण्यासंदर्भात खबरदारी घ्यावी तसेच ग्रामस्थांनीही या बाबीला सहकार्य करावे, अशी मागणी तालुक्यातील अनेक गावांतून होत आहे़