कोरोनाग्रस्तांवर आता गटविकास अधिकाऱ्यांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:43+5:302021-04-08T04:13:43+5:30
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५० गावांमध्ये पोहोचलेल्या कोरोनाच्या प्रत्येक रुग्णावर गटविकास अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार असून, पंचायत समितीला ...

कोरोनाग्रस्तांवर आता गटविकास अधिकाऱ्यांची करडी नजर
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५० गावांमध्ये पोहोचलेल्या कोरोनाच्या प्रत्येक रुग्णावर गटविकास अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार असून, पंचायत समितीला दररोज अहवाल सादर करावा लागणार आहे. यासंदर्भात झालेल्या ऑनलाइन बैठकीत पंधरावा वित्त आयोग, पाणीटंचाईसोबतच वार्षिक कृती विकास आराखड्याची माहिती सरपंचांकडून गटविकास अधिकारी यांनी घेतली.
धामणगाव पंचायत समितीमध्ये पहिल्या महिला अधिकारी म्हणून माया वानखडे या रुजू झाल्यानंतर पंचायत समितीमध्ये अनेक बदल घडले आहेत. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोणाचा वाढता आलेख पाहता, गटविकास अधिकाऱ्यांनी बुधवारी तालुक्यातील सरपंचांची ऑनलाइन बैठक घेतली. प्रत्येक सरपंचाची ओळख त्यांनी करून घेतली. नंतर प्रत्येक गावात राबविण्यात येणाऱ्या वार्षिक कृती आराखड्यावर त्यांनी चर्चा केली. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत प्रत्येक गावात कोणती कामे होणार आहेत, याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे, राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनची ग्रामीण भागात अंमलबजावणी व्हावी, यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने दररोज आपला अपडेट अहवाल पंचायत समितीला पाठवावा कोणत्या गावात किती अंमलबजावणी झाली, यावर गटविकास अधिकारी माया वानखडे यांचे लक्ष राहणार आहे.